मुंबई : मुंबईतील भाऊचा धक्का येथील न्यू फिश जेटीवर अंजनी पूत्र या मच्छीमार नौकेत गुदमरून दोघांचा मृत्यू झाल्याची खबळजनक घटना घडली आहे. तर अन्य चौघांनाही त्रास झाल्याने त्यांना जे.जे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांमध्ये नौकेच्या मालकाचा समावेश आहे. हे सर्व न्यू फिश जेटीवर अंजनी पूत्र या मच्छीमार नौकेतील खणांमध्ये मासे काढण्यासाठी उतरलेल्याची प्राथमिक माहिती आहे. ही घटना मंगळवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, अंजनी पुत्र ही मच्छीमार नौका मंगळवारी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास किरण भाई तांडेल यांनी न्यू फिश जेटी येथे आणली होती. त्यानंतर सकाळी नौकेतील तीन खणातली मच्छी विकण्यासाठी काढण्यात आली. दरम्यान, सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास एक कामगार इतर खणांमधील मासे काढण्यासाठी नौकेत उतरला. मात्र त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि तो बेशुद्ध पडला.
त्यामुळे अन्य दोघे आत उतरले आणि त्यांनी त्या कामगाराला बाहेर काढले. त्याच्याकडे अन्य कर्मचारी बघत असताना आतमध्ये उतरलेले बी. श्रीनिवास यादव (३५) आणि नौकेचा मालक नागा डॉन संजय (२७) हे दोघेही बेशुद्ध होऊन पडले. त्यानंतर बोटीवरील अन्य तिघेही बेशुद्ध पडले. त्या सर्वांना लगेच जे.जे .रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी बी श्रीनिवास आणि नागा डॉन या दोघांना मृत घोषित केले. सुरेश मेकला (२८) याला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. उर्वरित तिघांची प्रकृती स्थिर आहे.