मुंबई : मुंबईच्या वडाळा पूर्व येथील पालिकेच्या महर्षी कर्वे उद्यानातील उघड्या पाण्याच्या टाकीत पडून दोन चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अंकुश वागरे (४) आणि अर्जुन वागरे (५) अशी मृत्यू झालेल्या भावांची नावे आहेत. हे दोघे चिमुकले रविवार १७ मार्चपासून बेपत्ता होते.
मात्र, सोमवारी सकाळी पालिकेच्या महर्षी कर्वे उद्यानात या चिमुकल्यांचा उघड्या पाण्याच्या टाकीत मृतदेह आढळून आला. या घटनेने वडाळा परिसरात शोककळा पसरली आहे. या घटनेने या मुलांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून मुलांच्या आई-वडिलांनी आक्रोश व्यक्त केला आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, दोघेही रविवारी घरातून बेपत्ता झाले. त्यांच्या पालकांनी पोलिसांत दोन्ही मुलं बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. त्यावेळी त्यांनी सांगितले की, मी आणि माझी पत्नी रविवारी काही कामानिमित्त विलेपार्ले येथे गेलो होतो. आमच्या शेजारच्या व्यक्तींनी सांगितले की मुलं घरात नाहीत. त्यामुळे आम्ही पुन्हा तातडीने घरी परतलो. आम्ही त्या दोघांचा खूप शोध घेतला.
मात्र ते कुठेच सापडले नाहीत. शेवटी रात्री पोलिसांत पालकांनी धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी त्यांच्या सोसायटीचे सीसीटीव्ही फुटेजही तपासले. त्यावेळी पोलिसांना त्यांची काहीच माहिती मिळाली नाही.
तपास सुरू असतानाच सोमवारी सकाळी मुलांच्या आई-वडिलांच्या लक्षात आलं की, मुलं काही वेळासाठी गार्डनमध्ये खेळायला गेली होती. त्यामुळे ते पाण्याच्या टाकीत तर पडले नसतील? अशी शंका व्यक्त केली. पोलिसांच्या मदतीने पाण्याच्या टाकीत शोध घेण्यात आला. तेव्हा दोघेही पाण्याच्या टाकीत आढळून आले. पोलिसांनी तातडीने त्यांना बाहेर काढले आणि रुग्णालयात दाखल केले.
मात्र तोपर्यंत बराच उशिर झाला होता. ४ ते ५ वर्षांच्या या मुलांचा रात्रीच गुदमरून मृत्यू झाला होता. गार्डनमध्ये एक पाण्याची मोठी टाकी आहे. या टाकीला झाकण नाही. त्यामुळे पाण्याची टाकी पातळ प्लास्टिकने झाकून ठेवलेली होती. त्यामुळे खेळत असताना येथे टाकी असल्याचं मुलांच्या लक्षात आलं नसावं आणि ते थेट पाण्यात पडले असावेत असा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे. सध्या पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.