मुंबई : शिवसेना शिंदे गटाने ठाकरेंच्या आमदारांविरोधात 13 याचिका दाखल केल्या होत्या, या 13 याचिकांवर आज मुंबई उच्च न्यायालयात तातडीची सुनावणी पार पडली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रता प्रकरणी दिलेल्या निकालाविरोधात शिवसेना शिंदे गटानं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान, आजच्या सुनावणीत उच्च न्यायालयाने सर्व प्रतिवाद्यांना नोटीस पाठवली असून 8 फेब्रुवारीपर्यंत याचिकांवर उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, याप्रकरणाची पुढची सुनावणी 8 फेब्रुवारी रोजी होणार आहे.
या याचिकांमधून शिंदे गटाने ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र करण्याची मागणी केली होती. शिंदेची शिवसेना खरी तर त्यांचा व्हीप कसा लागू होत नाही? व्हिप न मानणाऱ्या ठाकरे गटातील आमदारांना अपात्र करा, अशी मागणी करत शिंदे गटाने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आज या याचिकेवर उच्च न्यायालयात तातडीची सुनावणी पार पडली.
‘या’ आमदारांना अपात्र करा : भरत गोगावले
ठाकरे गटाचे आमदार संजय पोतनीस, वैभव नाईक, सुनील राऊत, कैलास पाटील, राजन साळवी, राहुल पाटील, नितीन देशमुख, भास्कर जाधव, रवींद्र वायकर, सुनील प्रभू, प्रकाश फातर्फेकर, उदयसिंह राजपूत, रमेश कोरगावकर आणि अजय चौधरी यांना अपात्र करा, अशी मागणी भरत गोगावलेंनी याचिकेतून केली आहे.
तसेच शिंदे गट हाच खरी शिवसेना असल्याचं सिद्ध होत आहे, तर त्यांचा व्हीप न मानणाऱ्या ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्र का केलं नाही? असा प्रश्न या याचिकेतून करण्यात आला आहे. आम्हीच खरी शिवसेना असल्याने ठाकरे गटाच्या 14 आमदारांना निलंबित करण्याची मागणी याचिकेतून केली आहे.
ठाकरे गटही सर्वोच्च न्यायालयात
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी दहा जानेवारी रोजी शिवसेनेच्या आमदार अपात्रतेच्या याचिकेवरील निकाल दिला. त्यामध्ये त्यांनी बहुमताच्या आधारे शिवसेना ही शिंदे गटाची असल्याचं सांगितलं आहे. तर शिंदे गटाचे व्हिप भरत गोगावले यांचीच नियुक्ती योग्य असल्याचं सांगत ठाकरे गटाचे व्हिप सुनील प्रभू यांची निवड अवैध ठरवली.
तसेच त्यांनी आमदार अपात्रतेच्या दोन्ही गटाकडून आलेल्या याचिका फेटाळल्या आणि कुणालाही अपात्र ठरवलं नाही. याच निर्णयावर ठाकरे गटाने आक्षेप घेतला असून त्यावर आता त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयामध्ये फेरफार करून विधानसभा अध्यक्षांनी न्यायालयाचा अवमान केल्याचा दावा या याचिकेतून केला आहे.