मुंबई: किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत पणन हंगाम २०२३-२४ (रब्बी) मध्ये नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडून ज्वारी खरेदी करण्यासाठी केंद्र शासनाकडून ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत असलेली मुदत आता वाढवून ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत करण्यात आली आहे. त्यामुळे या हमीभाव योजनेचा राज्यातील हजारो शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याची माहिती पणन महासंघाचे अध्यक्ष दत्तात्रय पानसरे यांनी दिली आहे.
किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत पणन हंगाम २०२३-२४ (रब्बी) मध्ये ज्वारी खरेदी करण्यासाठी दिलेल्या मुदतीत नोंदणीकृत शेतकऱ्यांची ज्वारी खरेदी पूर्ण न झाल्याने, उर्वरित शेतकऱ्यांच्या ज्वारी खरेदीसाठी मुदतवाढ मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून वारंवार केली जात होती.
त्यासाठी शेतकऱ्यांच्या वतीने पणन महासंघाच्या संचालक मंडळाच्या वतीने या ज्वारी खरेदीसाठी आणखी मुदतवाढ मिळावी, यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे विनंती केली होती. त्यानुसार पवार यांनी केंद्र सरकारकडे व्यक्तिशः पाठपुरावा करत केंद्र सरकारकडून राज्यातील नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या ज्वारी खरेदीसाठीची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत वाढवून दिली आहे. त्यामुळे या राज्यातील हजारो शेतकऱ्यांना या हमीभाव योजनेचा लाभ होणार असून शेतकऱ्यांना त्यांच्या ज्वारी पिकाचा योग्य मोबदला मिळून आर्थिक फायदा होणार आहे, अशी माहिती पानसरे यांनी दिली आहे.