मुंबई : मुंबईत बदलापूर घटनेची पुनरावृत्ती घडली आहे. मुंबईतील भांडुपमधील एका नामांकित शाळेत तीन मुलींसोबत गैरवर्तन करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शाळेच्या लिफ्ट सफाई कर्मचाऱ्यांकडून गैरवर्तन केल्याचा आरोप केल्याचे मुलींनी पालकांना सांगितले. पालकांच्या तक्रारीनंतर पॅाक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 27 नोव्हेंबरच्या सकाळी 10 ते 1.30 वाजेच्या सुमारास घडला आहे.
या घटनेसंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील भांडुपमधील एका नामांकित शाळेत बुधवारी (दि. 27 नोव्हेंबर) रोजी बेसमेंटमध्ये 10 आणि 11 वर्षीतील दोन विद्यार्थीनी योगा करत होत्या. त्यावेळी त्या दोन विद्यार्थींनीवर शाळेतील लिफ्टची सफाई आणि देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांची नजर पडली. यावेळी त्याने या दोन विद्यार्थीनींची छेडछाड केली. त्यानंतर घडलेल्या या प्रकाराची तक्रार विद्यार्थीनीनी योगा शिकणाऱ्या शिक्षिकेसह आपल्या कुटुंबीयांकडे केली. या प्रकरणाचे गांभीर्य लक्ष्यात घेता बेसमेंटमध्ये असलेले सीसीटिव्हीची तपासणी केली असता या संपूर्ण प्रकार समोर आला. या प्रकरणी धक्कादायक बाब म्हणजे, लिफ्ट ग्राऊंड फ्लोवरवर संपते. परंतु लिफ्टची सफाई आणि देखभाल करणारा कर्मचारी हा बेसमेंटमध्ये पडद्याच्यामागे लपल्याचे सीसीटिव्हीमध्ये दिसून आला.
या प्रकरणाबद्दल पोलीसांना माहिती देण्यात आली. यावेळी भांडुप पोलिसांनी तक्रार नोंदवत गुन्हा दाखल केला. यामध्ये भारतीय न्यायिक संहिता 74, 78 आणि POCSO 8, 12 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी पीडित विद्यार्थीनीच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे की, हे प्रकरण पोलिसांपर्यंत जायला नको, या साठी शाळेकडून पालकांवर दबाव टाकण्यात आला. तसेच जेव्हा पालक शाळेत गेल्यावर सीसीटिव्हीची तपासणी करायची मागणी केली असता त्याने शाळेकडून सहकार्य न केल्याचे आरोपही पीडित विद्यार्थीनीच्या कुटुंबियांकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, राज्यभरात महिला, अल्पवयीन मुली यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्याचं दिसून येत आहे. महिला, अल्पवयीन मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.