भांडुप : बदलापूर येथील शाळेत विद्यार्थिनींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलेला असतानाच आता मुंबई उपनगरात भांडुपमध्येही एका नामांकित शाळेत एका लिफ्टची दुरुस्ती करण्यास आलेल्या कर्मचाऱ्याने तीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी आरोपी गोपाल भोभानी गौडा (वय-२७) याला अटक करण्यात आली आहे. तो मूळचा ओदिशाचा रहिवासी असून सध्या ठाण्याच्या दिवा भागात राहतो.
भांडुप व्हिलेज रोडवर असलेल्या एका नामांकित शाळेत बुधवारी हा प्रकार घडला. या शाळेच्या तळमजल्यावर विद्यार्थ्यांचे विविध कार्यक्रम घेतले जात असताना तिथेच लिफ्टचे काम सुरू होते. दहा वर्षाच्या दोन आणि एक बारा वर्षाची विद्यार्थिनी तिथे आल्या असता या कर्मचाऱ्याने केलेले अश्लील चाळे त्यांनी शिक्षकांना सांगितले. शिक्षकांनी तात्काळ या लिफ्ट कर्मचाऱ्याला पकडले आणि पोलिसांना माहिती दिली. त्याला न्यायालयाने २ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.