मुंबई : महायुती सरकारचा गुरुवारी शपथविधी झाल्यानंतर शनिवार, ७ डिसेंबरपासून मुंबईत नवनिर्वाचित सर्वपक्षीय आमदारांच्या शपथविधीसाठी दोन किंवा तीन दिवसांचे विशेष अधिवेशन घेण्यात येणार आहे. ७, ८ आणि ९ डिसेंबरदरम्यान हे अधिवेशन पार पडेल, अशी माहिती देण्यात आली. तिसऱ्या दिवशी १५ वी विधानसभा आणि सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे पहिले भाषण होईल. पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्षांची निवड केली जाईल. विधानसभा अध्यक्षपदासाठी अॅड. राहुल नार्वेकर यांच्यासह भाजपमधील काही ज्येष्ठ नेत्यांची नावे चर्चेत आहेत.
तीन दिवसांचे अधिवेशन पार पडल्यानंतर त्याच्या पुढच्या आठवड्यात नागपूर येथे हिवाळी अधिवेशन पार पडेल. यंदा प्रश्नोत्तरे, लक्षवेधी आदी मुद्द्यांचा कामकाजात समावेश नसल्याने नागपूर अधिवेशनाचे कामकाज ६ ते ८ दिवस चालवण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो, असे सांगण्यात आले.