मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. मात्र, या प्रचारात काही अती उत्साही नेत्यांमुळे उमेदवारांची पंचाईत होताना दिसत आहे. उत्साहाच्या भरात नेते भलतच बोलून जात आहेत. असाच एक प्रकार मुंबईच्या उल्हासनगर विधासभा मतदार संघात घडला आहे. येथील भाजप उमेदवार कुमार आयलानी यांच्या प्रचारासाठी बैठक घेण्यात आली होती. यावेळी भाजप उल्हासनगरचे अध्यक्ष प्रदीप रामचंदानी यांनी भाषणावेळी एक विधान केलं आहे. या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आलं आहे. ते म्हणाले, ज्यांना गद्दार म्हटलं जातं, ते मुख्यमंत्री होतात, असं खळबळजनक विधान प्रदीप रामचंदानी यांनी केलं आहे.
नेमकं काय म्हणाले प्रदीप रामचंदानी?
उल्हासनगर येथे भाजप उमेदवार कुमार आयलानी यांच्या प्रचारासाठी आयोजित भाजपा आणि साई पक्षाच्या कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी बोलत होते. त्यावेळी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. उल्हासनगर महापालिकेतील महापौरपदाच्या निवडणुकीचा दाखला देत असतानाच अचानक त्यांनी “आता कुणीही गद्दार राहिलेलं नाही, ज्यांना गद्दार म्हटलं जातं, ते मुख्यमंत्री होतात.
राजकारणाची परिभाषा बदलली आहे. ज्यांना आम्ही काल गद्दार म्हणत होतो, ते आज आमच्या पक्षात सहभागी झाले आहेत, त्यांना आज आम्ही खुद्दार म्हणतो. काळाने हा बदल केला आहे”, असं वक्तव्य प्रदीप रामचंदानी केलं आहे. त्यांच्या या विधानामुळे उपस्थितांमध्ये मोठी खळबळ उडाली.
दरम्यान, भाषण संपल्यानंतर प्रदीप रामचंदानी यांना याबाबत विचारलं असता, “मी तसं बोललोच नसून विरोधक ज्यांना गद्दार म्हणतात, ते मुख्यमंत्री बनतात. ते गद्दार नव्हे, तर खुद्दार असतात” असं मी म्हटल्याचा दावा प्रदीप रामचंदानी यांनी केला आहे.
रामचंदानी यांच्या या वक्तव्यावरून शिवसेना शिंदे गटाकडून संतप्त प्रतिक्रिया आली आहे. माफी मागा, अन्यथा भाजपचं काम करणार नाही, अशी भूमिका एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं घेतली आहे. उल्हासनगरमधील भाजप नेत्याच्या वक्तव्यामुळे महायुतीमधील नाराजी पुन्हा एकदा समोर आहे.