कल्याण : कल्याणमधील 13 वर्षांच्या विद्यार्थ्यानं राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमधून सर्वांनाचा धक्का बसला आहे. ही घटना रविवारी सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. विघ्नेश प्रमोद कुमार पात्रा (वय-13) असं मृत विद्यार्थ्याचं नाव आहे.
नेमकं प्रकरण काय?
कल्याण पूर्वेतील काटेमानिवली परिसरात एक नामांकित शाळा आहे. या शाळेत आठवीमध्ये विघ्नेश पात्रा शिक्षण घेत होता. रविवारी संध्याकाळी त्याचे वडील प्रमोद कुमार कामागावर गेले होते. आई आणि बहीण कामानिमित्त घराबाहेर गेली होती. त्याच दरम्यान त्याने टोकाचं पाऊल उचललं. प्रमोद कुमार घरी परतल्यानंतर त्यांना विघ्नेशनं गळफास घेतल्याचं आढळून आले. मुलाचा मृतदेह पाहून त्यांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली.
त्यानंतर आजूबाजूचे लोकं घरात जमा झाले. याबाबत कोळसेवाडी पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत विघ्नेशचा मृतदेह खाली उतरवून पोस्टमार्टमसाठी पाठविला. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी एडीआर दाखल केला तपास सुुरु केला आहे. तक्रार प्राप्त झाल्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल असं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
सुसाईड नोटमध्ये नेमकं काय?
दरम्यान, विघ्नेशने आत्महत्या करण्यापूर्वी एक सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यामध्ये वडिलांनी मोठया बहिणीवर रागावू नये. माझ्या जाण्याने तुमचा खर्च कमी होईल. शाळेतील दिपिका नावाची शिक्षिका आणि एक मुलगा मला चिडवित होते. त्यामुळे विघ्नेशवर खूप दबाव होता. त्यामुळे त्याने आत्महत्या केल्याचा या चिठ्ठीत उल्लेख केला आहे.