मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीतील पक्ष आपल्या वाट्याला आलेल्या जागेवर उमेदवार जाहीर करत आहे. काही जागांवर अजूनही पेच कायम आहे. अशातच आता अजित पवार यांच्या पक्षाने आपल्या उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी आज तिसऱ्या यादीची घोषणा केली आहे. या यादीत एकूण चार मतदारसंघांसाठी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांच्या उमेदवारीवरील सस्पेन्स मात्र अद्याप कायम आहे.
अजितदादांना त्यांच्या बंडात साथ देणारे पण लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्याकडे परत गेलेले अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांच्या पत्नीविरोधातील उमेदवार जाहीर करण्यात आला असून पारनेरमधून अजित पवार गटाने काशिनाथ दाते यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघातून निलेश लंके यांच्या पत्नी राणी लंके या राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवार आहेत. नाशिकच्या निफाड पिंपळगाव मतदारसंघात विद्यमान आमदार दिलीप काका बनकर यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून दिलीप बनकर यांच्यावरच पुन्हा विश्वास ठेवण्यात आला आहे. .
राष्ट्रवादी अजित पवार गटाची तिसरी यादी पुढीलप्रमाणे..
- निफाड – दिलीप बनकर
- पारनेर – काशिनाथ दाते
- गेवराई – विजयसिंह पंडित
- फलटण- सचिन पाटील