मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आमदारांनी सभात्याग केला आहे. विरोधी पक्षांचे आमदार विधानभवनातून बाहेर पडले आणि थेट विधिमंडळ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ जात त्यांना अभिवादन केलं. महाविकास आघाडीतील दोन पक्षांचे आमदार आज शपथ घेणार नसल्याचं समोर आलं आहे. भास्कर जाधव आणि जितेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
भास्कर जाधव यांनी याबाबत बोलताना म्हटलं की, आमचा शपथेला विरोध नाही. आमचा या सरकारला पाशवी बहुमत मिळालं आहे, जवळपास 90 टक्के बहुमत मिळालं आहे, हे देशात यापूर्वी कधी घडलेलं नाही. ही जादू इव्हीएमची असून सरकारचा निषेध करुन आज शपथ न घेण्याचा निर्णय घेतलाया आहे, असं भास्कर जाधव म्हणाले. या सरकारला पाशवी बहुमत मिळालं हा जनतेचा जनाधार नसून ती इव्हीएमची किमया आहे. लोकशाही वाचवायची असेल तर लोकशाही मार्गानं निषेध करणं गरजेचं आहे. विद्यमान सरकार ज्यापद्धतीनं सत्तेवर आलं त्याचा आम्ही निषेध करत आहोत. आज शपथ घेणार नाही असं भास्कर जाधव म्हणाले.
..हे पुतिनचं काम : जितेंद्र आव्हाड
विरोधकांना बोलू न देणं, त्यांना दाबून ठेवणं, वेळ आलीच तर तुरुंगात टाकणं हे पुतिनचं काम आहे. अजित पवारांचा प्रश्न माझ्यासाठी महत्त्वाचा नाही. मी इन्कम टॅक्सवर बोलून काही फरक पडणार आहे. भाजपवर काय फरक पडणार आहे का? त्यांना मतदान करणाऱ्या लोकांवर काय फरक पडणार आहे का? असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला आहे.
महाविकास आघाडीच्या आमदारांचीथोड्याच वेळात बैठक होणार आहे, अशी माहिती मिळत आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या दालनात महाविकास आघाडीच्या आमदारांची बैठक सुरु आहे. या बैठकीत शपथविधीबाबत निर्णय होणार आहे. भास्कर जाधव, जितेंद्र आव्हाड, नितीन देशमुख, संदीप क्षीरसागर यांच्यासह विरोधी पक्षांचे आमदार बैठकीला उपस्थित आहेत.
काँग्रेस नेते नाना पटोले, माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह काँग्रेस आमदार विधानभवनात दाखल झाले असून नाना पटोले, अंबादास दानवे यांच्या दालनात पोहोचले आहेत. या बैठकीत महाविकास आघाडीची पुढील रणनीती ठरवली जाणार आहे.