मुंबई : विधानसभा निवडणुकीत विरोधकांना दमदार यश मिळण्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कामाचा मोठा वाटा आहे, या शद्बात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच कौतुक शरद पवार यांनी केले आहे. तसेच, विधानसभा निवडणुकीत आपण गाफील राहिलो, अशी कबुलीही शरद पवार यांनी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन दिवसीय राज्यस्तरीय आढावा बैठकीस बुधवारी प्रारंभ झाला. त्यावेळी मार्गदर्शन करताना शरद पवार बोलत होते.
शरद पवार म्हणाले, ‘लोकसभा निवडणुकीत आपल्याला घवघवीत यश मिळाले. त्यामुळे आपण गाफील राहिलो. विधानसभा निवडणुकीत ‘हातचा मळ’ असल्याचा आम्ही समज केला. दुसरीकडे विरोधकांनी पराभवाची गांभीर्यानं नोंद घेतली होती. त्यात संघाच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक हातात घेतली होती. ते घरोघरी गेले. हिंदुत्त्वाचा प्रचार केला. दोन्ही बाजू त्यांनी मतदारांना सांगितल्या. मतदारासांशी प्रत्यक्ष संवाद साधला. त्याचा परिणाम त्यांना निकालाच्या रूपात बघायला मिळाला.’
निवडणुकांचे यश 100 टक्के नसते..
शरद पवार पुढे म्हणाले की, ‘निवडणुकांचे यश 100 टक्के नसते. 1952 च्या निवडणुकीत काँग्रेसने 90 टक्के जागा जिंकल्या होत्या. 1957 च्या निवडणुकांवेळी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ सुरू होती. त्याचा असा परिणाम झाला की, काँग्रेसच्या अनेक जिल्ह्यात शून्य तर काही जिल्ह्यात एक-दोन जागा निवडून आल्या. यशवंतराव चव्हाणांचे नेतृत्त्व असताना असे घडले होते. आपल्यापकडे पूर्ण पाच वर्षे आहेत. आजपासून कामाला लागा,’ असं आवाहन शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना केले आहे.
‘या’ युवकांना प्रधान्य नसेल
‘स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आता तोंडावर आहेत. या निवडणुकीत मोठी जोखीम घेणार आहे. महिलांमध्ये 50 टक्के आणि खुल्या गटात 60 टक्के उमेदवारी तरूणांना दिली जाईल. प्रस्थापित घराण्यातील युवकांना प्रधान्य नसेल. पक्ष सामान्यांचा करायचा असेल, तर याला पर्याय नाही,’ असंही शरद पवारांनी सांगितले.
‘पक्ष संघटनेत 70 टक्के नव्या चेहऱ्यांना संधी देण्याची गरज असून पस्तिशीच्या पुढच्या कार्यकर्त्यांनी आता राज्यपातळीवर काम करावे. दोन दिवसांच्या या बैठकीत त्यासंदर्भात निर्णय होईल, विद्यमान पदाधिकाऱ्यांनी पदत्याग करण्याबाबत स्वत:हून पुढे यावे; त्यांना राष्ट्रीय पातळीवर संधी आहे’ असे शरद पवारांनी सांगितले.