मुंबई : माजी मंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची मुंबईत तीन जणांकडून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. गोळीबारामध्ये त्यांच्या छातीला गोळी लागल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. यावर अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी राज्यमंत्री, विधिमंडळात प्रदीर्घकाळ राहिलेले माझे सहकारी बाबा सिद्दीकी यांच्यावर झालेल्या गोळीबाराची घटना अत्यंत दुर्दैवी, निषेधार्ह आणि वेदनादायी आहे. या घटनेत त्यांचे निधन झाल्याचे कळताच मला धक्का बसला. मी माझा चांगला सहकारी, मित्र गमावला आहे. या भ्याड हल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी राज्यमंत्री बाबत सिद्दिकी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत श्रद्धांजली अर्पण केली.
तसेच ते पुढे म्हणाले की, या घटनेची सखोल चौकशी करुन हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यात येईल. हल्ल्यामागच्या सूत्रधारही शोधण्यात येईल, असेही अजित पवार म्हणाले. बाबा सिद्दीकी यांच्या निधनामुळे अल्पसंख्यांक बांधवांसाठी लढणारा, सर्वधर्मसमभावासाठी प्रयत्न करणारा एक चांगला नेता आपण गमावला असून त्यांचे निधन हे राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नुकसान आहे. झीशान सिद्दीकी, सिद्दीकी कुटुंबिय आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दुःखात मी सहभागी असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी राज्यमंत्री, विधिमंडळात प्रदीर्घकाळ राहिलेले माझे सहकारी बाबा सिद्दीकी यांच्यावर झालेल्या गोळीबाराची घटना अत्यंत दुर्दैवी, निषेधार्ह आणि वेदनादायी असून या घटनेत त्यांचं निधन झाल्याचं समजून मला धक्का बसला आहे. मी माझा चांगला सहकारी, मित्र गमावला आहे. या भ्याड हल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. बाबा सिद्दीकी यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.