मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्यानंतर देखील महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाच्या मुद्यावरुन तिढा अजूनही कायम आहे. काँग्रेस आणि ठाकरे गटात काही जागांवरून सुरू असलेला तिढा अजूनही सुटलेला नाही. अशातच आज काँग्रेसचे विधीमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात यांनी आज मातोश्रीवर शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन चर्चा केली आहे.
मविआतील जागा वाटपाचा तिढा सोडवण्यासाठी मविआतील घटक पक्षांच्या हालचाली सुरू आहेत. काँग्रेसने ठाकरे गटासोबत सुरू असलेला वाद संपवण्यासाठी बाळासाहेब थोरात यांच्यावर काँग्रेस हायकमांडने चर्चेची जबाबदारी सोपवली आहे. त्यानुसार, आज बाळासाहेब थोरात यांनी सकाळी सिल्वर ओकवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केली. पवारांसोबत चर्चा केल्यानंतर थोरात यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्यासोबत देखील चर्चा केली असल्याची माहिती आहे.
बाळासाहेब थोरात काय म्हणाले?
उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केल्यानंतर बाळासाहेब थोरात यांनी सांगितले की, काँग्रेसचा प्रतिनिधी म्हणून उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची देखील भेट घेऊन चर्चा केली. थोडे विषय बाकी असून फार अडचण नाही. आघाडीमध्ये प्रत्येकाला वाटतं आपला उमेदवार निवडून येईल. मात्र हा वादाचा विषय नसून महाविकास आघाडीची आज बैठक होईल, असेही त्यांनी सांगितले. आजच्या बैठकीत उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना काय वाटतं हे जाणून घेतले आहे. आता बैठकीत आम्ही मार्ग काढू असेही थोरात यांनी यावेळी स्पष्ट केले.
तर, ठाकरे गटाचे खासदार अॅड. अनिल देसाई यांनी सांगितले की, थोड्या शिल्लक राहिलेल्या जागेवर सकारात्मक निर्णय होणार आहे. महाविकास आघाडीचे जागावाटप होईल, यात कोणतीही शंका बाळगण्याचे कारण नसल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
मतदानासाठी आता एक महिन्यापेक्षाही कमी कालावधी बाकी असताना मविआतील शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस यांच्यात वाद उफाळून येत आहे. दोन्ही पक्षांमध्ये 15 जागांवर वाद सुरू आहे. तर, यामध्ये विदर्भ आणि मुंबईतील जागांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे.