मुंबई : देशासह राज्यात जेएन-१ या नव्या व्हेरियंटच्या रुग्णात झपाट्याने वाढ होत आहे. रविवारी एकच दिवशी राज्यात ९ जेएन-१ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे आता राज्यात जेएन-१ व्हेरियंट रुग्णांची संख्या १० झाली आहे. ठाणे, पुणे आणि अकोला याठिकाणी या रुग्णांची नोंद झाली आहे. यात पुण्यातील एक रुग्ण हा अमेरिकेतून आला असल्याची माहिती आहे.
पुण्यात तीन रुग्णाची नोंद
दरम्यान, पुण्यात आता कोरोनाच्या नव्या व्हेरीयंटने शिरकाव केला असून आत्तापर्यंत तीन रुग्ण आढळले आहे. पुणे महापालिका हद्दीतील दोन तर पुणे ग्रामीण परिसरातील एकाचा समावेश आहे. त्यामुळे आता पुणेकरांना या नव्या व्हेरियंटचा धोका दिसत आहे.
मात्र, रुग्णांची लक्षणे सौम्य असून ते उपचारातून बरे होत असल्याचे सांगण्यात येत आहे.
ठाणे शहरात पाच रुग्ण
ठाणे महापालिकेच्या हद्दीत जे १ विषाणूचे पाच रुग्ण आढळून आले आहेत. ठाण्यात पुन्हा कोरोनाचा शिरकाव झाला आहे. यामध्ये एक महिला आणि चार पुरुषांचा सामावेश आहे. नवीन रुग्णांना गृह विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. सर्वांची प्रकृती स्थिर आहे. या सर्वांना ताप आसल्याने त्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. त्यानंतर त्यांचे नमुने पुण्याच्या लॅबमध्ये पाठवण्यात आले. त्यानंतर नवीन व्हेरीएन्टचे हे रुग्ण पॉझिटीव्ह असल्याचे उघड झाले आहे. ठाण्यात सध्या 28 कोरोनाची लक्षणे असलेली रुग्ण आहेत. नव्या विषाणूचे रुग्ण आढळून आल्याने पालिका प्रशासन दक्ष झाले आहे.
दरम्यान, रविवारी ठाणे मनपा क्षेत्रात ५ रुग्ण, पुणे मनपा क्षेत्रात २, तर पुणे ग्रामीण क्षेत्रात १ आणि अकोला मनपा क्षेत्रात १ अशा नऊ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यापैकी ८ पुरुष, तर १ महिला आहे. यातील १ रुग्ण ९ वर्षांचा लहान मुलगा असून १ जण २१ वर्षांची तरुणी आहे, तर १ जण २८ वर्षांचा तरुण असून उर्वरित ६ जण ४० वर्षांवरील नागरिक आहेत. यातील ८ जणांनी कोविड लस घेतली असून सर्व घरात क्वारंटाईन राहत असल्याची माहिती आहे. सर्वांना सौम्य लक्षणे असून सगळे रुग्ण बरे झाले आहेत.