मुंबई : राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचं हेलिकॉप्टर भरकटल्याची घटना घडली आहे. ही घटना आज बुधवारी दुपारी नागपूर ते गडचिरोली प्रवास करताना घडली. त्यांच्यासोबत मंत्री उदय सामंत, पार्थ पवार देखील होते. आता या हेलिकॉप्टरमधील सर्व जण सुखरुप आहेत. खराब हवामानामुळे दृष्यमानता अत्यंत कमी झाली होती. दरम्यान, हेलिकॉप्टर पायलटने मोठ्या कौशल्याने हेलिकॉप्टर जमीनीवर उतरवले. त्यामुळे पुढील मोठी दूर्घटना टळली आहे. त्यानंतर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी गडचिरोलीच्या कार्यक्रमाला हजेरी लावली.
याबाबत अजित पवार म्हणले, हेलिकॉप्टर व्यवस्थित उडालं, पण ते नंतर भरकटलं. हेलिकॉप्टर ढगात गेलं होतं. पण, देवेंद्र फडणवीस निवांत गप्पा मारत होते, सुरुवातील बरं वाटलं, पण इकडे ढग, तिकडे ढग दिसत होतं. मी फडणवीसांना म्हटलं जरा बाहेर बघा. पण, ते म्हणाले काही काळजी करू नका. आतापर्यंत माझे सहा अपघात झाले आहेत. अशा अपघातामध्ये मला काहीही झालेलं नाही. त्यामुळे तुम्हाला देखील काही होणार नाही. तुम्ही निवांत राहा, असे अजित पवार यांनी कार्यक्रमावेळी सांगितले.
पुढे म्हणाले, मी काळजीत पडलो होतो. पण, देवेंद्र फडणवीस निवांत होते. मागची पुण्याई असेल. त्यामुळेच ते इथपर्यंत पोहोचले आहेत. उदय सामंत देखील आमच्यासोबत होते. ते म्हणाले दादा जमीन दिसायला लागली, तेव्हा कुठे माझा जीव भांड्यात पडला, असा किस्सा अजित पवार यांनी कार्यक्रमात बोलताना सांगितला.
दरम्यान, सुदैवाने सर्वजण सुखरुप असल्याची माहिती मिळत आहे. हेलिकॉप्टर पायलटने यावेळी आपलं कौशल्य दाखवल्याचं बोललेलं जातं आहे. त्याने सुखरूप हेलिकॉप्टर जमिनीवर उतरवलं, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.