मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराने चांगलाच जोर पकडला आहे. राजकीय नेत्यांकडून वैयक्तिक आरोप प्रत्यारोपांच्या फैरीही झाडल्या जात आहेत. असाच प्रकार मुंबईतील चांदिवलीमध्ये बघायला मिळाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचारसभा आटपून जात असताना शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी अडविण्याचा प्रयत्न केला. तसेच गद्दार म्हणून डिवचण्याचा देखील प्रयत्न झाला. काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांच्या शेरीबाजीमुळे ते कमालीचे संतापले. मुख्यमंत्री शिंदे यांनी थेट काँग्रेस कार्यालयात जाऊन कार्यकर्त्यांना जाब विचारला आहे.
मुंबईतील चांदिवली विधानसभा मतदारसंघात शिंदेसेनेचे दिलीप मामा लांडे विरुद्ध काँग्रेसच्या आरिफ नसीम खान यांच्यात लढत होत आहे. सोमवारी रात्री मुख्यमंत्री शिंदे यांनी शिवसेनेचे उमेदवार दिलीप मामा लांडे यांच्या प्रचारार्थ चांदिवलीत सभा घेतली. सभा आटपून निघालेले असताना काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी अडवून त्यांना काळे झेंडे दाखविण्याचा प्रयत्न केला.
नेमकं प्रकरण काय?
गत दोन वर्षांपूर्वी शिवसेना पक्षात फूट पडली होती. तेव्हा एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या साथीने सरकार स्थापन करून राज्याची सूत्रे आपल्या हाती घेतली. तेव्हापासून ठाकरेंचे शिवसैनिक मुख्यमंत्री शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना गद्दार म्हणून डिवचत असतात. अगदी उद्धव ठाकरे सुद्धा प्रमुख सभांमधून गद्दार म्हणत शिंदेंवर निशाणा साधत असतात. सोमवारी रात्री शिंदे दिलीप लांडे यांची प्रचारसभा आटपून मुंबईच्या दिशेने जात असताना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी अडवून त्यांना काळे झेंडे दाखविण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्र्यांची गाडी थांबताच गद्दार गद्दार म्हणून घोषणाबाजीही करण्यात आली.
यावेळी मुख्यमंत्र्यांचा चांगलाच संताप झाला. त्यानंतर संतापलेल्या मुख्यमंत्र्यांनी थेट गाडीतून खाली उतरून कार्यकर्त्यांना जाब विचारला. समोरच उमेदवाराचे पक्ष कार्यालय होते. तिथे जाऊन तुम्हाला तुमचे नेते असेच शिकवतात का? असे चिडून मुख्यमंत्र्यांनी विचारले. तसेच घोषणाबाजी करणाऱ्यांची नावे लिहून घ्या, असे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यांची विचारपूस केली आणि नंतर त्यांना सोडून देण्यात आले.