मुंबई: मुंबईकरांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. देशातील पहिली पर्यावरणपूरक आणि पूर्णतः स्वदेशी तंत्रज्ञानाने सुसज्ज ई-वॉटर टॅक्सी सेवा अधिकृतपणे १ ऑगस्टपासून कार्यान्वित होणार असून, सुरुवातीला ही टॅक्सी गेटवे ऑफ इंडिया ते जेएनपीटी आणि डोमेस्टिक क्रूझ टर्मिनस ते जेएनपीए या दोन जलमार्गांवर धावणार आहे.

स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित जलवाहतूक सेवा
या टॅक्सीचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे, ती पेट्रोल-डिझेलवर चालणाऱ्या जुन्या टॅक्सींपेक्षा वेगळी, पूर्णपणे पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक टेक्नॉलॉजीवर आधारित आहे. या टॅक्सीचे उत्पादन परदेशातून आयात न करता, माझगाव डॉक शिपबिल्डिंग लिमिटेड (एमडीएल) यांनी केले आहे. एमडीएलने सहा ई-वॉटर टॅक्सी तयार केल्या असून, पहिली वातानुकूलित २४ आसनी टॅक्सी ‘इन्फिनिटी हार्बर सर्व्हिसेस’ या कंपनीकडे सुपूर्त करण्यात आली आहे.
भविष्यात सेवा वाढणार
ही सेवा भविष्यात केवळ जेएनपीटीपुरती मर्यादित राहणार नसून, बेलापूर, घारापुरी, मांडवा यांसारख्या ठिकाणांपर्यंत विस्तारण्याची योजना आखण्यात आली आहे. यामुळे समुद्रमार्गे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
परवडणाऱ्या दरात सेवा आणि प्रदूषणावर नियंत्रण
यापूर्वी मुंबईत सुरू करण्यात आलेल्या वॉटर टॅक्सी सेवा इंधनखर्च आणि जास्त भाडेदरामुळे फार काळ टिकल्या नाहीत. मात्र ई-वॉटर टॅक्सीमुळे इंधन खर्च वाचणार असून प्रवाशांना परवडणाऱ्या दरात जलवाहतूक सेवा उपलब्ध होईल. शिवाय, ही सेवा वाहतूक कोंडी आणि प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठीही प्रभावी ठरणार आहे.
चार्जिंग सुविधांचा विकास अंतिम टप्प्यात
ई-वॉटर टॅक्सीसाठी आवश्यक असलेली चार्जिंग सुविधा डोमेस्टिक क्रूझ टर्मिनस आणि जेएनपीटी जेट्टी येथे उभारण्यात येत असून, जेएनपीटीमध्ये स्वतंत्र चार्जिंग पॉइंट उभारण्याचे काम पुढील आठवड्यात पूर्ण होईल. यामुळे देशांतर्गत पातळीवर ई-वॉटर टॅक्सीच्या संपूर्ण शृंखलेची उभारणी शक्य होणार आहे.
या नव्या सुविधेमुळे मुंबईकरांना केवळ वेळेची बचतच नाही, तर शांत, सुरक्षित आणि हरित प्रवास अनुभवता येणार आहे. वाहतुकीला नवा आयाम देणारी ही ई-वॉटर टॅक्सी सेवा, मुंबईच्या स्मार्ट सिटी व्हिजनच्या दिशेने एक महत्त्वाचं पाऊल ठरणार आहे.







