मुंबई : लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं असून पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. या पार्शवभूमीवर आज पहिल्याच दिवशी श्री व्यंकटेश्वर स्वामी यांनी नागपूरमधून लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रात राज्यातून पहिला अर्ज भरला आहे.
दरम्यान, श्री व्यंकटेश्वर स्वामी हे भाजपचे समर्थक असून त्यांनी नागपूर लोकसभा मतदारसंघातून पहिला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघात भाजपनं नितीन गडकरी यांना उमेदवारी दिली आहे. तरी देखील व्यंकटेश स्वामी यांनी भाजपचा पूरक उमेदवार म्हणून आपला अर्ज दाखल केला आहे.
सोलापुरातूनही अर्ज भरणार
तसेच व्यंकटेश्वर स्वामी यांनी आपण सोलापुरातून राखीव मतदारसंघातूनही लोकसभा उमेदवार म्हणून अर्ज भरणार असल्याचं माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं आहे. पुढे बोलताना म्हणाले की, नितीन गडकरींसोबत मी पूरक उमेदवार राहणार आहे. गडकरींशी माझं काही बोलणं झालेलं नाही पण ते आमचे मोठे नेते आहेत.
मला देशासाठी काम करायचं आहे, त्यामुळे मला त्यांच्याशी बोलत बसून काही उपयोग नाही. देशाला त्यांनी तयार केलेले रस्ते दिसत आहेत. त्यांच्याच रोडवरुन मी येतो-जातो आहे. मी गडकरींना मत मिळावेत यासाठी आवाहन करणार आहे. असंही व्यंकटेश्वर स्वामी म्हणाले आहेत.