मुंबई : माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या नाराजी नाट्यावर बरीच चर्चा होऊ लागली आहे. अशातच आता या सर्व प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी प्रथमच भाष्य केले आहे. ते म्हणाले की, माजी मंत्री छगन भुजबळ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील ज्येष्ठ आहेत, त्यासंदर्भातील विषय जरा वेगळा आहे. तो त्याच पद्धतीने आणि गांभीर्याने त्याची सोडवणूक करण्यात येईल. त्याच पद्धतीने आगामी काळात पक्ष आणि पक्षाची शिस्त यालाही प्राधान्य देण्याच्या दृष्टीकोनातून पावले उचलली जातील. पण, या वाक्याचा आणि भुजबळ यांच्या नाराजीचा दुरान्वयेही संबंध नाही, हे मी आजच स्पष्ट करतो, अशी भूमिका खासदार सुनील तटकरे यांनी मांडली आहे.
सुनील तटकरे म्हणाले की, माजी मंत्री छगन भुजबळ यांच्या नाराजीसंदर्भात माजी खासदार समीर भुजबळ यांच्याशी मी एकदा बोललो आहे. भुजबळ हे माझ्या माहितीनुसार परदेशात गेले आहेत. ते परत आल्यानंतर त्यांच्या नाराजीसंदर्भात नक्कीच त्यांच्याशी चर्चा करण्यात येईल.
पक्ष आणि पक्षशिस्तीबाबत मी ठाम..
पक्ष आणि पक्षशिस्तीबाबत मी जे काही बोलत आहे, त्यावर मी ठाम आहे. माझ्या राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, प्रवक्ते, पदाधिकारी किंवा पक्षसंघटनेतील कार्यकर्ते यांच्यासंदर्भात मात्र पक्षाची शिस्त योग्य पद्धतीने राहिली पाहिजे, अशी माझी ठामपणाची भूमिका आहे. त्या दृष्टीकोनातूच पक्षाच्या रोडमॅपमध्ये त्याचा उल्लेख करण्यात येईल, असेही सुनील तटकरे यांनी सांगितले.
तटकरे पुढे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन दिवसीय राज्यस्तरीय शिबिर लवकरच घेण्यात येईल. स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बूथ पातळीवरील संघटन मजबूत करणार आहोत. त्या शिबिरात पक्षाच्या पुढील वाटचालीचा रोडमॅप आखण्यात येईल. या शिबिरानंतर म्हणजेच 2025 पासून पक्ष सदस्य नोंदणीचा प्रारंभ करण्यात येणार आहे. पक्षाची संघटना बांधणीचा आमचा प्रयत्न असणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांना उद्या दिल्लीत होणाऱ्या एनडीएच्या बैठकीबाबत माहिती असेल तर नक्कीच कोणीतरी बैठकीला उपस्थित राहील, असेही तटकरे म्हणाले.