मुंबई : विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी शालेय पोषण आहार योजनेच्या माध्यमातून राज्यातील बालकांना मोफत आहार दिला जातो. मात्र, विद्यार्थ्यांचं आरोग्य चांगलं राहण्याऐवजी बिघडण्याचं प्रमाण अलीकडच्या काही घटनांमधून दिसुन येत आहे. याचं कारण म्हणजे, शालेय पोषण आहारात होणारा हलगर्जीपणा. अनेकदा शालेय पोषण आहारात कधी निकृष्ट दर्जाचं जेवण दिल्याच्या तक्रारी समोर येतात. असाच एक किळसवाणा प्रकार ठाणे महानगरपालिकेच्या शाळेमध्ये घडला आहे. विद्यार्थ्यांना दिल्या जाणा-या जेवणामध्ये अर्धी तुटलेली पाल आढळून आली आहे.
आगासन गावात ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 88 येथे आज दुपारी लहान मुलांना खिचडी डाळ देण्यात आली. त्यात अर्धी तुटलेली पाल असल्याचे आढळून आले आणि ती खिचडी खाल्ल्याने वर्गात असलेल्या काही मुलांना याचा हळू हळू त्रास जाणवू लागला. तादरम्यान, महानगरपालिकेचे अधिकारी आणि डॉक्टरांची टीम शाळेमध्ये पोहोचली आहे.
या प्रकरणी चौकशी सुरु असल्याची माहिती असून ज्या मुलांना त्रास झाला त्यांची तपासणी करण्यात आली. यापुर्वी शालेय पोषण आहारात देखील अळ्या, घुस, उंदीर, झुरळ आढळल्याचे धक्कादायक प्रकार समोर आले होते.