ठाणे : अनैतिक संबंधातून गळा चिरुन पतीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथे घडली आहे. हत्या केल्याप्रकरणी एका महिलेला आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहे.
बलराम मिश्रा असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृतव्यक्ती बलराम उर्फ शेखर आणि त्याची पत्नी मूळचे उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथील कुहिदिया गावातील रहिवासी आहेत. लग्नानंतर ते दोघे भिवंडीतील काल्हेर येथील रेती बंदर रोड येथील ओम साई अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावर राहत होते. आरोपी अनुभव पांडे हा देखील त्याच अपार्टमेंट कॉम्प्लेक्समध्ये भाडेकरू म्हणून राहत होता. अनुभव पांडे आणि बलराम पांडे हे दोघेही उत्तर प्रदेशातील असल्याने त्यांच्यात जवळीक निर्माण झाली. काही दिवसानंतर अनुभव पांडेचे बलराम यांच्या पत्नीशी प्रेमसंबंध निर्माण झाले.
पती हा अनैतिक संबधात अडथळा ठरत असल्याने आरोपीने मृताच्या पत्नीशी संगनमत करून पती बलराम उर्फ शेखरच्या हत्येचा कट रचला होता. ठरल्याप्रमाणे 7 ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास बलरामची त्याच्या राहत्या घरातच धारदार शस्त्राने हत्या केली. त्याचा मृतदेह सुटकेसमध्ये भरून कशेळी भागात असलेल्या खाडी पात्रात फेकून दिला.
बलराम मिश्रा हा अचानक गायब झाल्याने त्याच्या भावाने नारपोली पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल केली. याप्रकरणी पोलीसांनी तपासाला सुरुवात केली. दरम्यान चौकशी सुरु असताना पोलीसांना पत्नीवर संशय आल्याने तिला ताब्यात घेतले त्यानंतर तिनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची गळा चिरुन हत्या केल्याची कबुली दिली. या प्रकरणी पोलीसांनी पत्नी राधा मिश्रा (वय-25) व अनुभव पांडे (वय-23) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
बलरामचा मृतदेहाचा शोध घेण्यासाठी कशेळी खाडी भागात शोध मोहीम राबवली जात असल्याची माहिती पोलीस निरीक्षक (गुन्हे) कुंभार यांनी दिली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कदम करीत आहेत.