ठाणे : ‘वेटिक पेट क्लिनिक’ या प्राण्यांच्या पेट क्लिनिकमध्ये एका पाळीव श्वानाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. पोलिसांनी यासंदर्भात कारवाई करत दोघांना अटक केली आहे. हे दोघेही या क्लिनिकमध्ये काम करत होते. मुख्य म्हणजे या मारहाणीचा व्हायरल करण्याच्या माणसीकतेतून व्हिडीओ रॅकोर्ड केल्याचे दिसत आहे. व्हिडीओ पाहून नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.
व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, श्वान टेबलवर बसला आहे. त्याला क्लिनिकमध्ये काम करणारा एक जण मारत आहे. तर दुसरा व्हिडीओ रेकॉर्ड करत आहे. त्याच्या एका हातात मोबाईल आहे. तर दुसऱ्या हाताने श्वानाला मारहाण करतोय.
या संदर्भात क्लिनिकच्या मालकाकडून प्रतिक्कीया व्यक्त करण्यात आली आहे. “ही अत्यंत अस्वस्थ करणारी घटना आहे. पाळीव प्राणी पालक आणि प्राणी प्रेमी म्हणून, हे धक्कादायक आहे. या घटनेची माहिती मिळताच आम्ही दोघांनाही ताबडतोब कामावरून बडतर्फ केलंय.”असे स्पष्टीकरण क्लिनिकच्या मालकाकडून देण्यात आले आहे.
श्वानाला मारहाण झाल्याची घटना ७-८ फेब्रुवारी रोजी घडली आहे. या श्वानाच्या मालकाचं लग्न होतं. त्यामुळे त्याच्या मालकाला याबाबत काहीच माहिती नव्हती. ज्यावेळी हा व्हिडीओ व्हायरल झाला तेव्हा या व्हिडिओवरून त्यांना याची माहिती मिळाली. कुत्र्याची तब्येत आता उत्तम असल्याची माहिती आहे.