मुंबई : वरळीत शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्याचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना दुपारच्या सुमारास घडली. मनोहर नलगे (६२) असे मृत्यू झालेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे. नलगे यांच्या मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. शिवसैनिक नलगे हे डिलाईल रोड येथील बीडीडी चाळ क्रमांक २० जवळील म्हसकर उद्यानातील पोलिंग बुथवर दिवसभर काम पाहत होते. दुपारी नलगे यांची तीव्र उन्हामुळे प्रकृती खालावली. त्यामुळे त्यांना तातडीने केईएम रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे नलगे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून राजकीय वर्तुळातही शोककळा पसरली आहे.
दरम्यान, खासदार तथा उमेदवार अरविंद सावंत यांनी नलगे यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला. निवडणूक आयोगाच्या गैरकारभारामुळे नलगे या शिवसैनिकाचा मृत्यू झाला, असा आरोप त्यांनी के ला. वरळीत सकाळच्या सुमारास निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याला देखील चक्कर आली होती. मात्र, पाण्याची व्यवस्था नाही, व्हेंटिलेशन नाही, लोकांना उन्हात उभे राहावे लागत होते. आजपर्यंतच्या इतिहासातील सगळ्यात घाणेरडी व्यवस्था ही आजच्या निवडणुकीत होती, असा आरोप सावंत यांनी केला.