मुंबई : मुंबईतील चेंबूर परिसरात सिद्धार्थ कॉलनीत गुरुवारी १ फेब्रुवारीला मध्यरात्रीच्या सुमारास घरगुती गॅस सिलिंडरचा अचानक भीषण स्फोट झाला. या घटनेत एकाच कुटुंबातील सात जण जखमी झाले आहेत. हा स्फोट इतका भीषण होता, की संपूर्ण परिसर कंपनाने हादरला. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या घटनेनं परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. एकाच कुटुंबातील ७ जण गंभीर जखमी झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, चेंबूर परिसरातील सिद्धार्थ कॉलनीमध्ये एका इमारतीत सुरेश गायकवाड यांचे घर आहे. ते आपल्या कुटुंबासोबत तेथे राहतात. गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास गायकवाड हे कुटुंबासोबत घरात झोपले असताना अचानक गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. यानंतर घराला मोठी आग देखील लागली. या आगीत सुरेश गायकवाड आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य होरपळले. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले. या घटनेने परिसरात भीतीच वातावरण पसरलं आहे.