नवी मुंबई: नवी मुंबईच्या कोपरखैरणे परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथे एका शिक्षकाने विद्यार्थिनीच्या घरात घुसून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे पीडितेचा 11 वर्षांचा भाऊ घरात असताना त्याच्या डोळ्यादेखत नराधम शिक्षकाने अत्याचार केला आहे. या प्रकरणी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. सौरभ खेडकर असं गुन्हा दाखल झालेल्या 25 वर्षीय आरोपी शिक्षकाचं नाव आहे. नराधम आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 7 मार्च रोजी पीडित तरुणीचे आई वडील गावी गेले होते. यावेळी घरी केवळ ती आणि तिचा 11 वर्षांचा लहान भाऊ होता. घरी कोणी नसल्याचा फायदा घेऊन आरोपी विद्यार्थिनीच्या घरात शिरला. त्यानंतर नराधमाने पीडितेशी जबरदस्ती करत तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. हा सगळा प्रकार 11 वर्षाच्या भावाच्या डोळ्यादेखत घडला.
आरोपी नवी मुंबई महानगर पालिकेच्या एका शाळेत कंत्राटी शिक्षक म्हणून काम करत आहे. त्याने त्याच्याकडे इंटर्नशिप करणाऱ्या 20 वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केला आहे. पीडित तरुणी ही सायकॉलॉजीची विद्यार्थिनी असून ती आरोपी शिक्षकाकडे इंटर्नशिप करत होती. याच ओळखीतून जवळीक साधत आरोपीनं हे कृत्य केलं आहे. एका शिक्षकानेच विद्यार्थिनीवर अशाप्रकारे अत्याचार केल्यानं परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेचा पुढील तपास कोपरखैरणे पोलीस करत आहेत.