पुणे : करोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान वाढलेल्या रुग्ण संख्येवर नियंत्रण आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठी राज्यात तज्ञ डॉक्टरांचे विशेष टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आली होती. आता पुन्हा एकदा टास्क फोर्सची निर्मिती करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.
करोनाच्या पहिल्या लाटेत १३ एप्रिल २०२० रोजीच्या शासन निर्णयान्वये राज्यात तज्ञ डॉक्टरांचे टास्क फोर्स निर्मिती करण्यात आली होती. आता राज्यात पुन्हा एकदा करोनाने डोके वर काढले असून रुग्णसंख्या वाढत आहे. तसेच कोरोना विषाणूचा जेएन. १ या उपप्रकाराचे रुग्ण वाढण्यास सुरुवात झाली आहे. या वाढत्या रुग्णाची संख्या लक्षात घेता टास्क फोर्सची पुनर्रचना करणे आवश्यक आहे. त्यानुसार टास्क फोर्सची पुनर्रचना करून नवीन टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी दिली.
या टास्क फोर्सच्या अध्यक्षस्थानी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे (आयसीएमआर) माजी प्रमुख डॉ. रमण गंगाखेडकर असणार आहेत. तसेच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ (नाशिक) कुलगुरू लेफ्ट. जनरल डॉ. माधुरी कानिटकर, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक, बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय ( पुणे) येथील डॉ. सुरेश कार्यकर्ते, नवले वैद्यकीय महाविद्यालय (पुणे ) येथील डॉ. वर्षा पोतदार आणि डॉ. डी. बी. कदम सदस्य आहेत. तर आरोग्य सेवा आयुक्त सदस्य सचिव असणार आहेत. याबाबतचा शासन निर्णय काढण्यात आला आहे.