मुंबई: टाटा समूहाच्या मालकीच्या ताज हॉटेल (Taj Hotel) समूहावर ५ नोव्हेंबर रोजी सायबर हल्ला झाला होता. हॅकर्सनी ताज हॉटेलच्या सुमारे 15 लाख ग्राहकांचा डेटा त्यांच्याकडे असल्याचा दावा केल्याची माहिती समोर आली आहे. हा डेटा परत करण्यासाठी त्यांनी 5000 डॉलर आणि तीन अटीही ठेवल्या आहेत. तथापि, ताज हॉटेल्स ग्रुपने सांगितले की, काळजी करण्यासारखे काही नाही. आम्ही या प्रकरणाची चौकशी करत आहोत आणि ग्राहकांचा डेटा सुरक्षित आहे. आम्ही सुरक्षा यंत्रणांनाही या परिस्थितीची माहिती दिली आहे.
लाइव्ह मिंटच्या बातमीनुसार, सायबर हॅकर्सनी ग्राहकांच्या डेटाच्या बदल्यात ताज हॉटेल (Taj Hotel) ग्रुपकडून 4 लाख रुपये (5 हजार डॉलर) पेक्षा जास्त रकमेची मागणी केली आहे. हॅकर्सनी त्यांच्या ग्रुपला डीएनए कुकीज असे नाव दिले आहे. हा डेटा अद्याप कोणालाही देण्यात आलेला नाही, असे त्यांनी म्हटले आहे. डेटा परत करण्यासाठी त्यांनी तीन अटी ठेवल्या आहेत. सर्वप्रथम त्यांनी चर्चेसाठी उच्चपदस्थ मध्यस्थ आणण्यास सांगितले आहे. तसेच, त्याची दुसरी मागणी अशी आहे की ते तुकड्यांमध्ये डेटा देणार नाही. डेटाचे आणखी नमुने मागू नयेत, अशी तिसरी अट आहे. या हॅकर्सनी 5 नोव्हेंबर रोजी 1000 कॉलम एन्ट्रीसह डेटा लीक केला होता.
15 लाख लोकांचा डेटा धोक्यात!
सुमारे 15 लाख ग्राहकांना या सायबर हल्ल्याचा फटका बसल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला आहे. त्याचा पर्सनल नंबर, घराचा पत्ता आणि मेंबरशिप आयडी अशी अनेक माहिती हॅकर्सपर्यंत पोहोचली आहे. धमकी देणाऱ्या हॅकर्सनी त्यांच्याकडे 2014 ते 2020 पर्यंतचा डेटा असल्याचे म्हटले आहे.
IHCL काय म्हणाले?
इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड (IHCL) च्या प्रवक्त्याने सांगितले की, आम्हाला हॅकर्सच्या या दाव्याची माहिती मिळाली आहे. तथापि, हा डेटा गैर-संवेदनशील आहे आणि या डेटामध्ये काहीही संवेदनशील नाही. कंपनीला आपल्या ग्राहकांच्या डेटाची काळजी आहे. त्यामुळे आम्ही या दाव्याची चौकशी करत आहोत. आम्ही ही बाब सायबर सुरक्षा एजन्सी आणि इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) यांनाही कळवली आहे. याशिवाय कंपनीच्या सुरक्षा यंत्रणेचीही चौकशी करण्यात येत आहे. ग्राहकांनी काळजी करण्याची गरज नाही. IHCL ताज, विवांता, जिंजर यासह हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील अनेक ब्रँड चालवते.