मुंबई : राज्यात इयत्ता 10 आणि 12 वीच्या परीक्षेवेळी अनेक वेळा कॉपी केल्याची प्रकरण समोर येत असतात. परंतु आता या कॉपी प्रकाराला आळा घालण्यासाठी राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मोठा निर्णय घेतला आहे. CBSE परीक्षेच्या धरतीवर राज्यात आता परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही लावण्यात येणार आहे. राज्य मंडळाच्या या धोरणामुळे परीक्षा केंद्रावरील सर्वच गैरप्रकारांना आळा बसण्यास मदत होणार आहे. दिवाळीनंतर 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा केंद्राच्या झाडाझडतीला ही सुरुवात होणार आहे. विद्यार्थी सुरक्षा आणि गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
परीक्षा केंद्रावरही असणार सीसीटीव्ही…
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या परीक्षेत होणारे गैरप्रकार टाळण्यासाठी त्याचबरोबर विद्यार्थी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आतापर्यंत अनेक वेळा सीसीटीव्ही बसवा आणि त्याचे स्टोरेज करण्याची चांगली क्षमता असावी अशा सूचना शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयांना खूप वेळा देण्यात आल्या आहेत. परीक्षा केंद्रावर आता सीसीटीव्ही बसवण्यात येणार आहे. त्यामुळे कॉपी करणारे विद्यार्थी, त्यांना मदत करणारे नातेवाईक आणि काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सीसीटीव्हीचा हा उपाय करण्यात आला आहे.
परीक्षा केंद्र कायम ठेवायचे? तर सीसीटीव्ही कॅमेरे अनिवार्य..
आजच्या परिस्थितीमध्ये अनेक परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही बसविण्यात आलेले नाहीत. त्यामुळे ही परिस्थिती पाहता आता सीबीएसई बोर्डाच्या धरतीवर फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात होणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेसाठी सीसीटीव्ही बंधनकारक करण्यात आले आहेत. ज्या परीक्षा केंद्रावर सीसीटीव्ही नसतील, त्यांचे परीक्षा केंद्रच रद्द होणार आहे. परीक्षा केंद्र कायम ठेवायचे असल्यास सीसीटीव्ही कॅमेरे अनिवार्य करण्यात आल्याची माहिती माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दिली आहे.