उल्हासनगर : बदलापूरच्या सोनिवली आदिवासी वाडीत जुलाब आणि उलट्यांमुळे दोन वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेला वेगळे वळण देत, कुटुंबीयांनी करणी केल्याचा संशय घेतल्याने रुग्णालयात जाण्यास नकार दिला. यामुळे परिस्थिती गंभीर झाली आणि शेवटी चिमुरडीला आपला जीव गमवावा लागला. तर याच घरातील अन्य पाच जणांची प्रकृती उपचार घेतल्याने सुधारत आहे.
बदलापूरच्या सोनिवली आदिवासी वाडीत दोन वर्षांच्या सपनाची उलटी-जुलाबाच्या त्रासाने प्रकृती गंभीर झाली. तिच्या कुटुंबीयांनी करणी केल्याच्या संशयाने उपचार घ्यायला नकार दिला आणि उपचाराआधीच चिमुकलीचा मृत्यू झाला. घरातील पाच जणांना देखील जुलाब आणि उलटीचा त्रास होत होता, मात्र कुटुंब करणी केल्याचा संशय घेत उपचार घेण्यास तयार नव्हते.
स्थानिक समाजसेवक किशोर मेहेर आणि पालिकेच्या आशासेविका ममता मेहेर यांनी मोठ्या मेहनतीने त्यांना समजावले. शेवटी उल्हासनगरच्या शासकीय रुग्णालयात दाखल झाल्यानंतर उर्वरित पाच जणांची प्रकृती सुधारत आहे. या घटनेची माहिती मिळताच बदलापूर पालिकेने त्वरित वैद्यकीय पथक या वाडीत पाठवले. येथे मेडिकल कॅम्प लावून परिसरातील नागरिकांची तपासणी करण्यात आली.
दूषित पाणी किंवा अन्नामुळे विषबाधा झाल्याची शक्यता वर्तवली जात असून, पाणी आणि अन्नाचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. स्थानिक वाड्यांमध्ये अद्यापही अंधश्रद्धेचा प्रभाव कायम आहे. कुटुंबातील सदस्यांनी करणी झाल्याचा संशय व्यक्त केला आणि उपचार टाळले. स्थानिक प्रशासन आणि समाजसेवकांच्या हस्तक्षेपामुळे उपचार सुरू झाले आणि अन्य व्यक्तींचे जीव वाचले, मात्र चिमुकलीच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.