मुंबई : राज्याच्या पावसाळी अधिवेशनातून मोठी बातमी समोर आली आहे. सोमवारी विधानपरिषदेत प्रसाद लाड यांना शिविगाळ केल्याप्रकरणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचे पाच दिवसांसाठी सभागृहातून निलंबन करण्यात आले आहे.
संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याबाबतची घोषणा केली. या प्रस्तावावर विधान परिषदेत मतदान घेण्यात आले असून हा ठराव बहुमताने संमत करण्यात आला आहे.
नेमकं प्रकरण काय?
राहुल गांधी यांनी हिंदूंवरून केलेल्या वक्तव्यावरील निषेध प्रस्तावावर विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिवीगाळ केली होती. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी आणलेल्या राहुल गांधी यांच्या निषेधाच्या प्रस्तावाला आक्षेप घेताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी लाड यांना थेट शिवीच हासडल्याने झालेल्या हमरीतुमरीत सभागृहात गदारोळ झाला.
दरम्यान, राहुल गांधी यांच्या निषेधाचा ठराव करण्याची परवानगी लाड यांनी मागितली. मात्र, उपसभापतींनी त्यांना नंतर चर्चा करू, सांगत खाली बसवले. यावेळी लाड यांनी घोषणा दिल्याने सभागृहात गोंधळ उडाला. त्यामुळे कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब झाले. कामकाज सुरू झाल्यानंतर लाड यांनी निषेधाचा प्रस्ताव मंजूर करून तो लोकसभेला पाठवा, अशी मागणी केली.
त्यावेळी विरोधी पक्षनेते बोलायला उभे राहिल्यानंतर प्रसाद लाड यांनी हातवारे केले. त्यावर आक्षेप घेताना दानवे यांचा तोल ढासळला. आपल्या जागेवरून बाहेर येत त्यांनी लाड यांना शिवीगाळ केली. तसेच लाड यांच्याकडूनही शिवीगाळ करण्यात आली. अखेर उपसभापतींनी कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब केले.
या प्रकारानंतर सोमवारपासून सत्ताधारी मंडळींकडून अंबादास दानवे यांचे निलंबन करा, अशी मागणी जोर धरत होती. मंगळवारी सभागृहाचे कामकाज सुरु करण्यापूर्वी सत्ताधारी पक्षाने घोषणाबाजी केली. त्याशिवाय विधानपरिषदेत निलंबनाच्या मागणीसाठी भाजप आमदारांकडून घोषणाबाजी करण्यात आली.
या पार्श्वभूमीवर संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांना पाच दिवसासाठी निलंबन केल्याची घोषणा केली. त्यानंतर तात्काळ विधान परिषदेत या प्रस्तावावर मतदान घेण्यात आले. त्यावेळी हा ठराव बहुमताने संमत करण्यात आला.