मुंबई : मुंबईस्थित अभिनेत्री कादंबरी जेठवानी हिने केलेल्या आरोपांच्या चौकशीनंतर आंध्र प्रदेश सरकारने तीन वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांचे निलंबन केले आहे. चित्रपट निर्माता आणि वायएसआर काँग्रेसच्या नेत्याने तिघा अधिकाऱ्यांना प्रक्षोभित केल्याचा आरोप कादंबरीने केल्यानंतर हे निलंबन करण्यात आले आहे. विजयवाड्याचे माजी आयुक्त कांथी राणा टाटा, विजयवाड्याचे माजी उपायुक्त विशाल गुन्नी आणि माजी डीजीपी (गुप्तचर) सीताराम अंजनेयालू, अशी या अधिकाऱ्यांची नावे आहेत. आंध्र प्रदेश सरकारने ही मोठी कारवाई केली आहे.
NTR आयुक्तालय पोलिसांनी बॉलिवूड अभिनेत्री आणि तिच्या कुटुंबीयांवर दाखल केलेल्या कथित खोट्या गुन्ह्याचा तपास सुरू केला आहे. अभिनेत्रीच्या तक्रारीवरून इब्राहिमपट्टणम पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तर निलंबित करण्यात आलेल्या तिन्ही पोलीस अधिकाऱ्यांना विजयवाडा सोडण्यास मनाई करण्यात आली आहे. कादंबरी यांनी काही पुराव्यांसह तिच्यावर आणि तिच्या कुटुंबीयांवर दाखल झालेल्या गुन्ह्याची माहिती पोलिसांना दिली. अखिल भारतीय सेवा (शिस्त आणि अपील) नियम, १९६९ च्या नियम ३(१) अन्वये तिन्ही अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे.
कोण आहे कादंबरी जेठवानी?
कादंबरी जेठवानी हिच्या IMDb प्रोफाइलनुसार ती २८ वर्षीय मॉडेल-अभिनेत्री आहे. तिने अहमदाबादमधील उच्चभ्रू शाळांमध्ये शिक्षण घेतले आहे. तसेच भरतनाट्यममध्ये विशारद मिळवले आहे. आईच्या नोकरीनिमित्त मुंबईला आल्यानंतर, एका दिग्दर्शकाच्या भेटीमुळे तिने “सड्डा अड्डा” या हिंदी चित्रपटातून पदार्पण केले. यानंतर तिने कन्नड, तेलुगु, मल्याळम आणि पंजाबी चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. यात ओईजा (कन्नड), आता (तेलुगु), आय लव्ह मी (मल्याळम) आणि ओ यारा ऐंवी ऐंवी लुट गया (पंजाबी) यांचा समावेश आहे.
नेमकं प्रकरण काय?
कांथी राणा आणि गुन्नी यांच्यावर केवळ तोंडी सूचना देऊन कृती केल्याचा आणि योग्य तपास न करता अभिनेत्रीला अटक केल्याचा आरोप आहे. तसेच एफआयआर दाखल न करता अभिनेत्रीला अटक केल्याचा आरोप अधिकाऱ्यांवर आहे. दरम्यान, जेठवानी यांनी ऑगस्टमध्ये एनटीआरचे पोलीस आयुक्त एसव्ही राजशेखर बाबू यांच्याकडे तक्रार केली होती.
तसेच आई-वडिलांना कोणतीही पूर्वसूचना न देता मुंबईहून विजयवाडा येथे नेण्यात आले. तसेच त्यांना कोणतेही कारण नसताना एक महिन्याहून अधिक काळ न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आल्याची तक्रार अभिनेत्रीने कादंबरी यांनी दिली आहे. या प्रकरणी जेठवानी यांचे वकील एन श्रीनिवास म्हणाले कि, वायएसआरसीपी नेते विद्यासागर यांनी जेठवानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना खंडणीच्या आरोपात अडकवण्यासाठी जमिनीची कागदपत्रांत छेडछाड केली. तसेच या अधिकाऱ्यांनी अनेक दिवस जामीन मिळू दिला नाही.
पोलिसांनी अभिनेत्री आणि तिच्या वृद्ध आई-वडिलांचा अपमान करून अवैधपणे कोठडीत ठेवले. अभिनेत्री कांदबरी यांचे कुटुंबाला चाळीस दिवसापर्यंत न्यायालयीन कोठडीमध्ये राहावे लागले. मागील सरकारच्या काळात मुंबईतील एका महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यावर दाखल केलेला खटला मागे न घेतल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याची माहिती अभिनेत्री यांनी दिली आहे.