मुंबई : ड्रग्ज माफिया ललित पाटीलला अटक केल्यानंतर त्याने गौप्यस्फोटांची मालिका सुरु करण्याचे संकेत दिले आहेत. मी ससून रुग्णालयातून पळालो नाही, तर मला पळवलं गेलं असा दावा ललित पाटीलने केला. याआधी शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांच्यावर आरोप केला होता. आता ललित पाटीलच्या दाव्यानंतर सुषमा अंधारेंनी पुन्हा आक्रमक पवित्रा घेतला आहे.
ललित पाटीलला पळवून लावण्यात काही राजकीय नेते सहभागी आहेत. त्याच्या सोबत दादा भुसे आणि शंभूराजे देसाई यांची देखील नार्को टेस्ट करा. याचा तपास केंद्रीय यंत्रणांकडे द्यावा, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली. इतकंच नाही तर ससून रुग्णालयाच्या डीनची नार्को टेस्ट करा, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केल्याचे वृत्त एबीपी माझाने दिले आहे.
सुषमा अंधारेंचे यापूर्वी केलेले आरोप
दरम्यान ललित पाटील पुण्यातील ससून रुग्णालयातून पळून गेल्यानंतर सुषमा अंधारे यांनी गंभीर आरोप केले होते. ससून रुग्णालयातील ड्रग्ज प्रकरणात सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांच्यासोबत अजून दोन मंत्र्यांचा समावेश आहे, असा दावा सुषमा अंधारेंनी 13 ऑक्टोबरला केला होता. या दोन्ही मंत्र्यांची नावं लवकरच पुढे आणू, असंही त्या म्हणाल्या होत्या. दादा भुसेंचे कॉल रेकॉर्ड तपासा, पुरावे लवकरच समोर आणणार, असा दावा सुषमा अंधारेंनी केला होता.