मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यानंतर पवार कुटुंबातही राजकीय दुफळी निर्माण झाली आहे. त्यातच, आता बारामती लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरुन राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटही आग्रही असून ती जागा आपल्याला मिळावी यासाठी अजित पवार प्रयत्न करत आहे. दुसरीकडे सुप्रिया सुळे यांनी थेट तुतारीच्या चिन्हासह आपला उमेदवारी फोटो शेअर करत एकप्रकारे उमेदवारीच जाहीर केली असल्याचं दाखवून दिलं आहे. अशातच आता सध्या एक कॉल रेकॉर्डींग समोर आलं असून सुप्रिया सुळेंनी बारामती मतदारसंघात प्रचाराला सुरूवात केल्याचं चित्र दिसत आहे.
बारामतीमध्ये पहिल्यांदाच पवार विरुद्ध पवार असा यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सामना रंगण्याची शक्यता आहे. विद्यमान खासदार सुप्रिया सुळे या महाविकास आघाडीकडून, तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या महायुतीकडून मैदानात उतरण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने सुनेत्रा पवार यांचे जोरदार प्रयत्नही सुरू असून त्यांनी लोकसभा मतदारसंघात फिरण्यास सुरुवात केली आहे.
दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे यांचे एक ऑडिओ कॉल रेकॉर्डींग सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. सोशल मीडियातून हे रेकॉर्डींग समोर आलं असून त्यात, सुप्रिया सुळे आपल्या तुतारी चिन्हाचा प्रचार करताना मतदाराशी संवाद साधत आहेत. मात्र, सुप्रिया सुळेंशी फोनवर संभाषण करणारा मतदार बोलताना थोडासा दबावात दिसून येतो. अखेर, तो सुप्रिया सुळेंना स्पष्टपणे सांगतो की, ताई आम्ही वहिनींचं काम करत आहोत, आम्ही दादांसोबत आहोत. सध्या सोशल मीडियावर हे कॉल रेकॉर्डींग चांगलंच व्हायरल झाल आहे.
कॉल रेकॉर्डींगमधील संवाद
हॅलो, सुप्रियाताई बोलणार आहेत.
सुप्रिया सुळे – हॅलो, मी सुप्रिया सुळे बोलतेय
बारामतीकर – नमस्कार,
ताई सुळे – नमस्कार, आपला तुतारीवाला माणूस पोहोचला का नाही गावात?
बारामतीकर – नाही
ताई सुळे – अरे माझं चिन्ह आहे आता, तुतारीवाला माणूस, पक्षाचं चिन्ह पोहोचलं का नाही तुम्हाला
बारामतीकर – ताई, आम्ही वहिंनीचं काम करतोय, दादांचं.
सुळे – करा, मी तुम्ही माझे मतदार आहात ना, मग माझं कर्तव्य आहे, ही लोकशाही आहे