मुंबई : राज्याच्या मुख्य सचिव पदाचा पदभार सुजाता सौनिक यांनी आज स्वीकारला आहे. सुजाता सैनिक १९८७ बॅचच्या आयएएस (ISI) अधिकारी आहेत. मावळते मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांच्याकडून त्यांनी पदभार स्वीकारला आहे.राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा मानही सौनिक यांना मिळाला आहे. सुजाता सौनिक यांचे पती मनोज सौनिक देखील राज्याचे मुख्य सचिव होते. मावळते मुख्य सचिव नितीन करीर यांनी मुख्य सचिव सुजाता सौनिक यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
राज्याचे मुख्य सचिव नितीन करीर ३० जून रोजी सेवानिवृत्त होणार होते. त्यामुळे करीर यांच्या निवृत्तीनंतर राज्याच्या मुख्य सचिवपदी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. या शर्यतीत ज्येष्ठतेनुसार १९८७च्या तुकडीतील गृहविभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव सुजाता सौनिक, १९८८ च्या तुकडीतील महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार आणि १९८९ च्या तुकडीतील मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव इक्बालसिंह चहल मुख्य सचिवपदाचे दावेदार होते. अखेर सुजाता सौनिक यांची या महत्त्वाच्या पदावर वर्णी लागली आहे.
आएएस अधिकारी ते संयुक्त राष्ट्र सारख्या अनेक विभागात कामाचा अनुभव
सुजाता सौनिक या १९८७ च्या बॅचच्या IAS अधिकारी आहेत. त्या राज्याच्या गृहविभागात अतिरिक्त मुख्य सचिव होत्या. अलीकडेच कार्मिक आणि प्रशिक्षण विभागाने त्यांना सचिवपदी बढती दिली होती. त्यांनी सामान्य प्रशासन विभागात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणूनही काम केलं आहे. सार्वजनिक आरोग्य विभागासह अनेक विभागात कामाचा त्यांना मोठा अनुभव आहे.
३ दशकांपासून महत्त्वाच्या पदांवर काम
सुजाता सौनिक यांनी महत्त्वाच्या पदांवर काम केलं आहे. वित्त, शिक्षण, आरोग्य सेवा, आपत्ती व्यवस्थापन आणि जिल्हा, राज्य आणि फेडरल स्तरावर शांतता राखणे आणि भारतीय प्रशासकीय सेवा, संयुक्त राष्ट्र यांसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये सार्वजनिक धोरण आणि प्रशासनाचा मोठा अनुभव त्यांना आहे.
मंत्रालयात झालेल्या या कार्यक्रमाला अपर मुख्य सचिव नितीन गद्रे, महानगर पालिका आयुक्त डॉ. भूषण गगराणी, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, अपर मुख्य सचिव अनूप कुमार, अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा, पर्यटन विभाग प्रधान सचिव जयश्री भोज, प्रधान सचिव आभा शुक्ला, प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, प्रधान सचिव मनीषा वर्मा यांच्यासह इतर विभागाचे प्रधान सचिव, सचिव आणि वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
काय म्हणाल्या सुजाता सौनिक?
यावेळी बोलताना सुजाता सौनिक म्हणाल्या कि, राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू आहे. यामध्ये शेतकरी, महिला, बालके, युवक तसेच सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी महत्वाचे धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहे. या योजना आणि धोरणात्मक निर्णयांची अंमलबजावणी करण्यासाठी मी प्रयत्न करेन.
शासनाने माझ्यावर मोठी जबाबदारी सोपविली आहे. राज्याच्या मुख्य सचिवपदाची धुरा सांभाळतांना सर्व लोकप्रतिनिधी, सर्व वरिष्ठ अधिकारी तसेच प्रशासकीय यंत्रणेच्या सहकार्याने मी जनतेसाठी प्रामाणिकीपणे आणि शाश्वत काम करण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहीन, अशा शब्दात नव नियुक्त मुख्य सचिव सौनिक यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहे.