नवी मुंबई : नवी मुंबईत धक्कादायक घटना घडली आहे. 14 वर्षांनी बाप होण्याचं सुख अनुभवण्यासाठी आसूसलेल्या बापानं रुग्णालयाच्या तगाद्याला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी नवी मुंबईतील तेरणा रूग्णालयाविरोधात नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नरेंद्र गाढे असं गळफास घेऊन आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, गाढे कुटुंब नवी मुंबईत वास्तव्यास आहे. नरेंद्र गाढे नेरुळमधील मनपा वाचनालयात सुरक्षा रक्षकाचं काम करत होते. गाढे दाम्पत्य जीवापाड कष्ट करून स्वतःच्या संसाराचा गाडा पुढे ढकलत होते. लग्नाला अनेक वर्ष झाली तर आयुष्यात नव्या पाहुण्यांच्या आगमनाची दोघेही आतुरतेनं वाट बगत होते.
अखेर लग्नाच्या 14 वर्षांनी गोड बातमी आली. गाढेंच्या घरात पाळणा हलला. पत्नीनं गोंडस जुळ्या मुलांना जन्म दिला. मात्र, जन्माला आल्यानंतर नवजात बाळांची तब्येत काहीशी नाजुक होती. त्यांना उपचारांची गरज होती. त्यामुळे दोघांनाही नेरुळच्या तेरणा रुग्णालयातील अति दक्षता विभागात दाखल करण्यात आलं होतं.
रुग्णालयात बाळावर उपचार सुरू असताना सातत्यानं बिल भरण्यासाठी तगादा लावला जात होता. दरम्यान, नरेंद्र गाढे यांनी सुरुवातीला 90 हजार रुपये भरले होते. तरिदेखील रुग्णालय प्रशासनाकडून वारंवार बिल द्या, असा तगादा लावण्यात येत होता. एवढंच नाहीतर आधी बिल भरलं नाही तर, बाळांवर सुरू असलेले उपचार थांबवले जातील, असंही रुग्णालयाकडून सांगितलं जात होतं.
अखेर रुग्णालय प्रशासन आणि परिस्थितीसमोर हतबल झालेल्या नरेंद्र गाढेंनी टोकाचं पाऊल उचलत आपलं जीवन संपवलं. नरेंद्र गाढे यांनी आत्महत्या करताना सुसाईड नोट लिहून ठेवली होती. या सुसाईड नोटमध्ये आपल्या मृत्यूला रुग्णालय प्रशासनाला जबाबदार धरावं असं नमूद करण्यात आलं आहे. दरम्यान, या प्रकरणी नेरूळ पोलीस ठाण्यात तेरणा रूग्णालयाविरोधात गुन्हा दाखल दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.