मुंबई : राज्यातील साखर कारखान्यांचा ऊस गाळप हंगाम येत्या १५ नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय सोमवारी मंत्रालयात मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत घेण्यात आला. साखर कारखान्यांनी आणि साखर आयुक्तालयाने त्यानुसार कार्यवाही करावी, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. साखर संकुल देखभाल निधीसाठी केली जाणारी प्रति टन ५० पैसे कपात यावर्षीपासून रद्द करण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला.
बैठकीला सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील, सहकार विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ. पी. गुप्ता, साखर आयुक्त डॉ. कुणाल खेमनार, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील, साखर कारखाना संघाचे संचालक प्रकाश आवाडे, वेस्ट इंडियन शुगर मिल्स असोसिएशनचे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे, साखर संघाचे व्यवस्थापकीय संचालक संजय खताळ, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक दिलीप दिघे उपस्थित होते.
बैठकीत ऊस गाळप आढावा आणि हंगाम नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली. यावर्षी ऊस लागवडीचे प्रमाण कमी आहे. दिवाळी, विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या तारखा गृहीत धरून हंगाम सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर चर्चा झाली असून त्यांनी १५ नोव्हेंबरपासून हंगाम सुरू करण्यास मान्यता दिली असल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले.