मुंबई: एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून काही रक्कम दरवर्षी देण्यात येते. या वर्षी दिवाळी भेटबाबत शासन, निवडणूक आयोग दरबारी कर्मचाऱ्यांना निराशा हाती आली. अखेर कर्मचाऱ्यांचा विजय होत येत्या २९ नोव्हेंबर रोजी कर्मचाऱ्यांना ६ हजार रुपये याप्रमाणे दिवाळी भेट मिळणार असल्याची माहिती एसटी महामंडळाकडून देण्यात आली. यामुळे उशिराने का होईना दिवाळी भेट मिळणार असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
दिवाळी या आनंद उत्सवात सर्वत्र उत्साहाचे वातावरण असताना एसटी कर्मचारी मात्र तुटपुंज्या रकमेत यंदाची दिवाळी साजरी करत होते. गेल्या वर्षी सरसकट सर्व कर्मचाऱ्यांना ५००० इतकी रक्कम दिवाळी भेट म्हणून देण्यात आली होती. या वर्षी महामंडळाने कर्मचारी व अधिकारी यांना सरसकट ६००० रुपये रक्कम दिवाळी भेट म्हणून देण्यासाठी आचारसंहिता लागू होण्याअगोदर म्हणजेच १५ ऑक्टोबर रोजी ५२ कोटी रुपये मागणीचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला होता. या प्रस्तावासंदर्भात महामंडळाने सरकारकडे निधी मिळावा, यासाठी वारंवार विचारणा करण्यात आली.
मात्र, यावर दिवाळी सरूनही कोणताच निर्णय न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी होती. याच पार्श्वभूमीवर ८ नोव्हेंबर रोजी एसटी महामंडळाकडून निवडणूक आयोगाकडे कर्मचाऱ्यांची आचारसंहितेमुळे अडकलेली दिवाळी भेट मार्गी लावण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला. या प्रस्तावाला देखील आठवडा उलटून कोणता निर्णय झाला नाही. अखेर राज्यातील विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात आली. यानंतर एसटी महामंडळाकडून कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट देण्यासाठी हालचाली सुरू करण्यात आल्या. एसटी कर्मचारी संघटना आणि एसटी महामंडळाचा झालेल्या बैठकीनंतर अखेर २९ नोव्हेंबर रोजी कर्मचाऱ्यांना प्रती व्यक्ती ६ हजार रुपयांप्रमाणे दिवाळी भेट देण्याबाबत शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.