मुंबई: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मराठा समाजाचे राज्य मागासवर्ग आयोगाकडून ऑनलाईन सर्वेक्षण सुरू आहे. हे सर्वेक्षण करण्याची शेवटची मुदत ३१ जानेवारी होती. आता मागासवर्ग आयोगाने सर्वेक्षणाची मुदत आणखी दोन दिवस वाढवून दिली आहे. याबाबत आज मागासवर्ग आयोगाची ऑनलाईन बैठक पार पडली.
मंगळवारी दुपारी तीन वाजता या बैठकीला सुरुवात झाली. या बैठकीत सध्या राज्यात सुरु असलेल्या मराठा समाजाच्या सर्वेक्षणाबाबत चर्चा झाली. गेल्या काही दिवसांपासून हे सर्वेक्षण सुरू आहे. यासाठी पुण्यातील गोखले इन्स्टिट्युटकडून एक सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे. हे सर्वेक्षण करताना अनेक अडचणी येत असल्याच्या काही अधिकाऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून मराठा समाजाच्या मागासलेपणाचा अहवाल लवकरात लवकर कसा करता येईल, यावर देखील या बैठकीत चर्चा झाली.
राज्यातील मराठा समाजाचे सामाजिक व शैक्षणिक मागासलेपण तपासणी करण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाने काही निकष निश्चित केले आहेत. त्यानुसार सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. पण या सॉफ्टवेअरमध्ये अनेक ठिकाणी अडचणी आल्याचे दिसत आहे. यावरही आज बैठकीत चर्चा झाली. मागासवर्ग आयोगाने सर्वेक्षण वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. सर्वेक्षणाचे काम शासकीय कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे. सर्वेक्षणाचे काम ३१ जानेवारी पर्यंत पूर्ण करण्याचे सूचना देण्यात आल्या होत्या. पण आता याची आणखी २ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे