नवी मुंबई : पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर जामीन अर्जावरील सुनावणी दरम्यान वेळेत ‘से-Say’ दाखल करण्यासाठी 1 लाख रुपये लाचेची मागणी केली. त्यापैकी 40 हजार रुपये लाच स्वीकारताना सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलीस नाईक यांना नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई मंगळवारी (दि. 4) करण्यात आली आहे.
कोपरखैरणे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सागर कुमार टकले (वय-37), कोर्ट पैरवी कर्मचारी पोलीस नाईक प्रज्ञेश नरेंद्र कोठेकर (वय-42) असे लाच स्वीकारताना पकडलेल्या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी एका व्यक्तीने नवी मुंबई एसीबी कार्यालयात 30 मे रोजी तक्रार दिली होती.
याबाबत अधिक माहिती अशी की, सागर टकले आणि प्रज्ञेश कोठेकर दोघेही कोपरखैरणे पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. तक्रारदार यांच्या चुलत्यावर कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून त्यांना अटक करण्यात आली आहे. ते सध्या पोलीस कोठडीत आहेत.
पोलीस कोठडीची मुदत संपल्यावर जामीन अर्जावरील सुनावणी दरम्यान वेळेत ‘से-Say’ सादर करण्यासाठी तसेच उर्वरित गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक सागर टकले याने तक्रारदार यांच्याकडे 1 लाख रुपये लाचेची मागणी करण्यात आली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी एसीबी कार्य़ालयात जाऊन तक्रार केली.
एसीबीच्या पथकाने प्राप्त तक्रारीची मंगळवारी (दि.4) पडताळणी केली असता एपीआय सागर टकले याने तक्रारदा. यांच्याकडे १ लाख रुपये लाचेची मागणी करुन तडजोडी अंती 40 हजार रुपये मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार एसीबीच्या पथकाने सापळा रचला. एपीआय सागर टकले याने लाचेची रक्कम पोलीस नाईक प्रज्ञेश कोठेकर याच्याकडे देण्यास सांगितले. त्यानुसार कोठेकर याला तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडून ताब्यात घेतले.