मुंबई: एसटी कर्मचाऱ्यांच्या एप्रिल महिन्याच्या वेतनाकरता राज्य सरकारने मार्च महिन्याचा सवलत मूल्यांचा ४१६ कोटी ९० लाख रुपयांचा निधी अलीकडेच एसटी महामंडळाला अदा केला आहे. २ मे रोजी त्याबाबतचे परिपत्रक काढण्यात आले. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे एप्रिल महिन्याचे वेतन वेळेत मिळणार आहे.
एसटी महामंडळात २५० आगारात तब्बल ८७ हजार कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांचे वेतन ठरल्याप्रमाणे ७ तारखेला मिळणे अपेक्षित आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून कर्मचाऱ्यांना वेतन उशिराने मिळत असल्याने मोठ्या आर्थिक कोंडीला सामोरे जावे लागते. अलीकडेच या घटना पुन्हा घडू नये, यासाठी एसटीच्या ८७ हजार कर्मचाऱ्यांचे वेतन ७ तारखेलाच मिळेल, असे आश्वासन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. त्यानुसार, प्रत्यक्ष हालचाली सुरू होत राज्य सरकारने मार्च महिन्याचा, सवलत मूल्याचा ४१६ कोटी ९० लाख रुपयांचा निधी अलीकडेच एसटी महामंडळाला अदा केला.