ST Employee: मुंबई : एसटी कर्मचारी आणि अधिकारी यांना सरसकट 6000 रुपयांचा सानुग्रह बोनस जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी आता गोड होणार आहे. मंंत्री उदय सामंत यांनी यासंदर्भात माहिती दिली. गेल्या अनेक वर्षांपासून तोट्यात असणाऱ्या एसटीची आर्थिक स्थिती सध्या काही प्रमाणात सुधारत असल्याचं चित्र आहे. अशातच एसटी कर्मचाऱ्यांसाठी काही महत्त्वपूर्ण निर्णय देखील राज्य शासनाकडून घेण्यात आले आहेत. तसेच एसटी महामंडळास स्व-मालकीच्या गाड्या खरेदी करण्यासाठी यंदाच्या वर्षी 900 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
आज मंत्री सामंत आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांसोबत बैठक पार पडली. या बैठकीमध्ये काही महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा झाली. त्यानुसार एसटी खात्याअंतर्गत बढतीसाठी आवश्यक असणारी 240 दिवसांची अट रद्द होईपर्यंत सदर बढतीस स्थगिती देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे सातवा वेतन आयोगानुसार वेतन देण्याकरिता 30 नोव्हेंबर 2023 पूर्वी सेवा शक्ती संघर्ष एस.टी. कर्मचारी संघाशी बैठक घेऊन निर्णय देण्यात येईल.