मुंबई: अवघ्या १५ दिवसांवर दिवाळी सण येऊन ठेपला आहे. दिवाळी म्हटले की आनंदाचा सण. अशातच एसटीने प्रवास करणाऱ्या सामान्य प्रवाशांना दिवाळीच्या पार्श्वभूमीवर दिलासा मिळाला आहे. दिवाळीनिमित्त प्रतिवर्षी करण्यात येणारी हंगामी १० टक्के दरवाढ न करण्याचा निर्णय यंदा एसटी महामंडळाने घेतला असून त्यामुळे जुन्या तिकीट दरानेच प्रवाशांना प्रवास करता येणार आहे.
२८ ऑक्टोबरपासून सर्वत्र दिवाळी सणाला सुरुवात होणार आहे. यानिमित्त चाकरमान्यांची आपल्या मूळ गावी जाण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. सुट्ट्यांचे नियोजन करत रेल्वे, एसटी गाड्यांचे आरक्षण करण्यास चाकरमान्यांकडून सुरुवात झाली आहे. मात्र, ऐन सणासुदीच्या दिवसात एसटी बसेसच्या तिकीट दरात प्रतिवर्षी हंगामी १० टक्के दरवाढ करण्यात येते. तर खासगी गाड्या देखील आपल्या तिकीट दरात वाढ करतात. याचा नाहक मनस्ताप सामान्य प्रवाशांना होतो, हीच बाब ओळखत यंदा एसटी महामंडळाकडून सामान्य प्रवाशांना दिलासा देण्यात आला आहे. यंदा २५ ऑक्टोबर ते २५ नोव्हेंबर या कालावधीत दिवाळी हंगामात परिवर्तनशील भाडेवाढ करण्याबाबतचे परिपत्रक रद्द करण्यात आले आहे.