मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर स्वतःचा शिवसेनेचा गट अधिकृत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर मागच्या काही महिन्यांपासून यावर कायदेशीर खल सुरू होती. सर्वोच्च न्यायलयात हे प्रकरण पोहोचल्यानंतर न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना आमदार अपात्र प्रकरणी कार्यवाही करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आपला निकाल दिला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह त्यांच्याबरोबर असणाऱ्या आमदारांना पात्र ठरवण्यात आले आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे हेच राज्याच्या मुख्यमंत्री कायम राहणार आहेत. हा निकाल उद्धव ठाकरे गटासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरत नाहीत, असे निरिक्षण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नोंदवले आहे. त्याशिवाय, पक्षप्रमुखाचा निर्णय अंतिम हा ठाकरे गटाचा दावाही राहुल नार्वेकर यांनी फेटाळला आहे. शिवसेना पक्षप्रमुख गटनेत्याला पदावरून हटवू शकत नाहीत, असं राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केलं आहे.
पक्षप्रमुखाला सर्वोच्च अधिकार देणं हे लोकशाहीला घातक आहे. असे झाले तर पक्षाला कुणीच पक्षप्रमुखाविरोधात बोलू शकणार नाही. शिवसेनेच्या घटनेत राष्ट्रीय कार्यकारिणीचा निर्णय अंतिम आहे, असे विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केले आहे.
शिवसेना पक्षप्रमुख कुणालाही पदावरून हटवू शकत नाहीत. शिवसेना नेतृत्वावरील दाव्यांबाबत निवडणूक आयोगाने दिलेला हा निकाल स्पष्ट आहे, असेही ते म्हणाले आहेत. तसेच, त्यामुळे बंडखोरी झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना खरी शिवसेना होती, भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून झालेली निवड ही वैध ठरते, असे राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केले आहे.
निवडणूक आयोगाकडे उद्धव ठाकरे गटानं सादर केलेल्या दाव्यातही तफावत होती. एकीकडे ठाकरे गटाने सांगितले होते की, पक्षाची बैठक सेनाभवनात झाली, तर दुसरीकडे सांगतात तीच बैठक ऑनलाईन झाली होती. त्यामुळे त्यांची कागदपत्र संभ्रम निर्माण करणारी आहेत, असे राहुल नार्वेकर यांनी म्हटले आहेत.