मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने आज (ता.१८ एप्रिल) दोन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. यामध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उत्कर्षा रूपवते यांना ‘वंचित’कडून उमेदवारी देण्यात आली आहे. तर साताऱ्यातून सैनिक असलेल्या प्रशांत कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
महाविकास आघाडी कडून उमेदवारी मिळाली नाही म्हणून उत्कर्षा रूपवते नाराज होत्या. त्यांनी काही दिवसांपूर्वी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेत उमेदवारी संदर्भात चर्चा केली होती. त्यानंतर त्यांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना आपल्या सर्व पदांचा राजीनामा पाठवला.
त्यानंतर आज त्यांनी अकोला येथे वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची भेट घेत वंचितमध्ये प्रवेश केला आणि आजच त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. रुपवते यांच्या उमेदवारीने शिर्डी लोकसभा मतदारसंघातील सगळी गणिते बदलणार असून त्याचा फटका महाविकास आघाडीला बसण्याची शक्यता आहे.