Disha Salian Death Case : दिशा सालियान मृत्यू प्रकरणी अखेर एसआयटी स्थापन केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. राज्य सरकारकडून मुंबई पोलिसांना एसआयटी स्थापन करण्याचे लेखी आदेश देण्यात आले आहेत. अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिशा सालियान मृत्यू प्रकरणी SIT चौकशीचे आदेश अधिवेशनात दिले होते. अखेर आज १२ डिसेंबरला राज्य सरकारकडून मुंबई पोलिसांना एसआयटीसंदर्भात लेखी आदेश जारी करण्यात आले आहेत. (Disha Salian Case)
दरम्यान, दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडून सुरू होता, मात्र सीबीआयनं दिशाचा मृत्यू हा इमारतीवरून तोल जाऊन पडल्यामुळे झाला आहे, असा निष्कर्ष काढला होता. दिशा सालियान मृत्यू प्रकरणात कोणताही राजकीय हस्तक्षेप नसून साक्षीदारांचे जबाब, फॉरेन्सिक रिपोर्ट आणि इतर तथ्यांच्या आधारे सीबीआयनं हा निष्कर्ष काढला असल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं.
आदित्य ठाकरेंची अडचण वाढणार?
आदित्य ठाकरे यांच्या अडचणीही वाढणार असल्याची चर्चा होत आहे. राज्य सरकारनं दिशा सालियान प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याचे पोलिसांना आदेश दिले असून याप्रकरणी आदित्य ठाकरेंचीही चौकशी केली जाणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. या प्रकरणात आदित्य ठाकरेंच्या चौकशीची मागणी सतत केली जात होती. या संदर्भात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गेल्या हिवाळी अधिवेशनात SIT चौकशीचे आदेश दिले होते. त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. (Aditya Thackeray)