मुंबई : बदलापूर लैंगिक अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण राज्य हादरलं असताना आता मुंबईमधून एक धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल परिसरात 29 वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे.
अधिक माहिती अशी की, पीडीत महिला सीएसएमटी स्थानकाबाहेर 22 सप्टेंबरच्या रात्री एकटीच असताना दोन अज्ञात व्यक्ती तिथे आले. यातील एकाने महिला आरडा-ओरड करेल या अनुशंगाने तिचे तोंड दाबुन धरले. त्यानंतर सीएसएमटी रेल्वे स्थानकाबाहेरील टॅक्सी स्टॅडच्या पाठीमागे दोघांनी आळीपाळीने महिलेला धमकावून तिच्यावर बलात्कार केला असल्याचे पीडित महिलेने तक्रारीत म्हटले आहे.
तक्रारीनंतर गुन्हा दाखल..
सदर प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार प्रथम सीएसएमटी लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हाच गुन्हा आता पुढील तपासासाठी मुंबई पोलिसांच्या माता रमाबाई मार्ग पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलं?
राज्यात महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये एकामागून एक वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. याचदरम्यान मुंबईतील या घटनेनं खळबळ उडाली आहे. मुंबईतील सीएसएमटी रेल्वे परिसरात नेहमीच वर्दळ असते. मात्र असे असताना देखील महिलेवर अत्याचार झाल्याने पुन्हा एकदा सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. 22 सप्टेंबरच्या रात्री सीएसएमटी रेल्वे परिसरात पीडित महिला उभी होती. यावेळी दोन अज्ञात व्यक्ती तिच्याजवळ आले. यातील एकाने महिला आरडा-ओरड करेल या अनुशंगाने तिचे तोंड धरले, असं महिलेने पोलिसांकडे नोंदवलेल्या तक्रारीत म्हटलं आहे. यानंतर सीएसएमटी रेल्वे स्थानकाबाहेरील टॅक्सी स्टॅडच्या पाठीमागे दोघांनी आळीपाळीने महिलेला धमकावून तिच्यावर अत्याचार केल्याचं तक्रारीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.