मुंबई : सायन येथील लोकमान्य टिळक वैद्यकीय महाविद्यालयात अर्थात सायन रुग्णालयातील निवासी डॉक्टरचा होस्टेलच्या खोलीत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणी केलेल्या चौकशीत निवासी डॉक्टरला ताप आल्याने त्याने स्वतःच अँटिबायोटिकचे सलाईन लावल्याने त्याची रिअॅक्शन आली. त्यातच त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
डॉ. सौरभ धुमाळ असे या निवासी डॉक्टरांचे नाव आहे. पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या शल्यचिकित्सा (जनरल सर्जरी) विषयाच्या दुसऱ्या वर्षात ते शिक्षण घेत होते. ते मूळचे परभणी जिल्ह्यातील आहेत. होस्टेलच्या पाचव्या मजल्यावर ते राहत होते. अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे म्हणून त्यांची ओळख होती. मुले मानसिक तणावाखाली असतील तर त्यांचे समुपदेशन करण्यासाठी त्यांचा नेहमीच पुढाकार असे.
दरम्यान, गुरुवारी डॉ. धुमाळ बराच वेळ त्यांच्या खोलीतून बाहेर न आल्याने त्यांच्या सहकाऱ्यांनी शोध घेतला. त्यावेळी ते खोलीत मृतावस्थेत आढळले. बेडवर सलाईनही आढळले. रुग्णालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वीच डॉ. धुमाळ १० दिवसांची रजा घेऊन परतले होते. मात्र, ताप आल्याने ते होस्टेलवरच उपचार घेत होते. ते अँटिबायोटिकचे सलाईन घेत होते.
याबाबत बोलताना सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी म्हणाले की, डॉ. धुमाळ अतिशय गुणी विद्यार्थी होते. इतर विद्यार्थ्यांना ते सहकार्य करत असत. औषधाचे दुष्परिणाम झाल्याने त्यांच्या शरीरावर रॅश आले होते. शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह त्यांच्या कुटुबियांकडे सोपविण्यात आला. या घटनेचा अधिक तपास सायन पोलीस करत आहेत.