मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबर रोजी मुंबईत हत्या करण्यात आली होती. या घटनेने राज्यात एकच खळबळ उडाली होती. या हत्येमागील तपास अजूनही सुरू असून अनेक जणांना अटक करण्यात आली आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. आता या प्रकरणात अजून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मुंबईतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने एक मोठा खुलासा केला आहे. सिद्दिकी यांच्या हत्येनंतर पुण्यातील ‘या’ नेत्याला सुद्धा लक्ष्य करण्यात येणार होते, असा दावा पोलीस अधिकाऱ्याने केला आहे. बिश्नोई गँगेच्या प्लॅन बी मधील शूटर्सला ही जबाबदारी सोपवण्यात आली होती. अशी माहिती समोर आली आहे.
पुणे पोलीस अलर्ट..
मुंबई गुन्हे शाखेकडून याप्रकरणात पुण्यातून एक पिस्तूल जप्त करण्यात आले होते. त्याआधारे ही हत्या करण्यात आली होती. सिद्दिकी यांच्या हत्येचा तपास करताना पोलिसांना बिश्नोई गँगच्या पुणे प्लॅनची माहिती मिळाली. ही माहिती संवेदनशील असल्याने पोलिसांनी या नेत्याचे नाव जाहीर केले नाही. मुंबई पोलिसांनी याविषयीची इत्यंभूत माहिती पुणे पोलिसां कळवली आहे. यानंतर पुणे पोलीस अलर्ट मोडवर आले आहे. आरोपींनी या नेत्याच्या घराची आणि परिसराची, त्याच्या कार्यालयाची रेकी केली होती की नाही, याचा तपास पोलीस करत आहेत.
बाबा सिद्दिकींची हत्या..
बॉलिवूडसह राजकीय वर्तुळात मोठे प्रस्थ असलेल्या बाबा सिद्दिकीची हत्या नेमकी कोणत्या कारणासाठी करण्यात आली, यासंबंधी अनेक चर्चा आहेत. त्यामध्ये सलमान खान याच्या जवळीकतेमुळे ही हत्या करण्यात आल्याचे बोलले जात आहे. बाबा सिद्दिकी 12 ऑक्टोबर रोजी त्यांची हत्या करण्यात आली होती. ते मुलगा झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयातून बाहेर पडले होते. ते घरी जाण्याच्या तयारीत होते. तर काही कारणांमुळे झिशान कार्यालयात परतले होते. बाबा सिद्दिकी घराकडे जाण्यासाठी वळले तेव्हा त्यांच्यावर आरोपींनी गोळ्या झाडल्या. त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. पण त्यांना वाचवण्यात यश आले नाही.
या हत्येनंतर मुंबई पोलिसांनी व्यापक तपास मोहिम हाती घेतली. या प्रकरणाचे धागेदोर उत्तर भारतातील हरयाणा, पंजाबपर्यंत दिसून आले. या हत्येनंतर समाज माध्यमावर ही हत्या बिश्नोई गँगने घडवून आणल्याचा दावा करण्यात आला होता. पोलिसांनी या प्रकरणा दहाहून अधिक जणांना अटक केली आहे.