मुंबई: विरार येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. विरार भागातील अर्नाळा परिसरात टपाल खात्यात आलेली मुलाखतीची पत्रं आधार कार्ड, नोकरीचे पत्रं, आयुर्विमा पॉलिसी, क्रेडिट कार्ड तसेच अन्य महत्त्वाची कागदपत्रे शहरातील नाल्यात आढळल्याचे समोर आले आहे. यामुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणामुळे परिसरात संतापाची लाट पसरली असून ने नेमकं कृत्य कोणी आणि का केलं? याचा तपास केला जातोय. आधार कार्ड तसेच अन्य कागदपत्रांचे वितरण एक तर खासगी कुरिअर मार्फत होत असतं किंवा टपाल खात्यामार्फत होत असते. मात्र अर्नाळा परिसरातील एका नाल्यात हजारो कागदपत्रांचा संच आढळला आहे. त्यात मोठ्या प्रमाणात भारतीय आयुर्विम्याची प्रमाणपत्रे, बँकांची डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड तसेच अनेकांच्या मुलाखतीची पत्रे व अन्य कागदपत्रांचा समावेश आहे. याप्रकरणी अर्नाळा पोलिस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विरार मधील अर्नाळा परिसरात एक सामाजिक कार्यकर्ता लघुशंका करण्यासाठी गेलेला असता त्याला ही कागदपत्रे दिसली. ती न्यालयाच्या कडेला पाण्यात पडलेल्या अवस्थेत होती. ही कागदपत्रे ताब्यात घेतली, असता अत्यंत महत्त्वाची कागदपत्रे लोकांना वितरित न करता कचऱ्यात फेकून दिल्याचे समोर आले आहे. आता याप्रकरणी अर्नाळा पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे.
मुख्य टपाल कार्यालयातून उप-टपाल कार्यालयात वितरणासाठी पत्रे जात असतात. त्यानंतर उप-टपाल कार्यालयातून ती पोस्टमन त्या त्या संबंधित व्यक्तींना वितरित करत असतो. अशी टपाल खात्याच्या टपाल वितरणाची पद्धत असते. टपाल कार्यालयाच्या क्षेत्रातील विस्तार आणि लोकसंख्या लक्षात घेऊन विविध विभाग पाडलेले असतात. विभागानुसार पोस्टमन त्याचे वितरण करत असतो.
अनेकांचे नोकरीचे स्वप्न भंगले..
घटना घडलेला विभाग अर्नाळा टपाल कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात येतो. ही कागदपत्रे वितरणासाठी पोस्टमनकडे दिली होती का? दिली असल्यास संबंधित पोस्टमन कोण होता?, त्याने ही कागदपत्रे का वितरित केली नसावेत? असे प्रश्न निर्माण होत आहेत. नाल्याच्या किनारी सापडलेल्या कागदपत्रात अनेकांना पाठवलेली मुलाखतीची पत्रे आहेत. ही पत्रे संबंधितांना मिळाली असती, तर अनेकांचे नोकरीचे स्वप्न पूर्ण झाले असते मात्र हे पत्र संबंधितांना न मिळाल्याने त्यांच्या भविष्याशी खेळ खेळला जात आहे.
अनेक महत्वाची कागदपत्रेच परस्पर फेकून दिल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.